तब्बल अकरा वर्ष पगार न मिळालेल्या शिक्षकांच्या उपोषणाची दखल न घेतल्याचा परिणाम
प्रतिनिधी / बार्शी
बार्शी येथील बार्शी एज्युकेशन सोसायटीच्या सुलाखे हायस्कूल या शाळेतील एका शिक्षकास तब्बल 11 वर्षे पगार न मिळाल्याने ते शिक्षक प्रकाश कांबळे आणि त्यांचे कुटुंबीय गेली सात दिवसापासून त्यांच्या घरी आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणाची या शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्था यांनी कोणतीही दखल घेतली नाही तसेच सोलापूर शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांनी या शाळेच्या शिक्षकांचे वेतन देयक सादर करण्याचे दिलेले पत्र याचीही दखल न घेतल्याने आज सोलापूर शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी सुलाखे हायस्कूल आणि सुलाखे उच्च माध्यमिक विद्यालय यांचे कोणतेही ही वेतन देयक स्वीकारू नये असे आदेश वेतन व भविष्य निर्वाह निधी चे अधीक्षक व संबंधित विभागाला दिले आहेत. तर आता उपोषण कर्ते प्रकाश कांबळे यांचे पगार त्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय या दोन्ही शाळांमधील कोणत्याही शिक्षकाचे पगार किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पगार जमा होणार नाही असे स्पष्ट आदेश शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी दिले आहेत
सविस्तर वृत्त असे की सुलाखे हायस्कूल मधील शिक्षक प्रकाश कांबळे गेली आठ दिवस आपल्या घरी आपल्या कुटुंबासमवेत आमरण उपोषणास बसले आहेत 2009 सालापासून या शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत 2016साली त्यांना शासनाने अॅप्रोवल मंजूर केले मात्र मुख्याध्यापक यांनी कांबळे यांचे वेतन देयक संधीग्ध आणि त्रुटी पूर्ण पाठवले असा आरोप कांबळे यांनी करत अकरा वर्षे पगार दिला नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे . मात्र या आंदोलनावेळी बार्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी आणि हवालदार संजय खैरे यांनी वेळोवेळी प्रयत्न करून या शिक्षकाच्या उपोषणा संदर्भात पत्रव्यवहार केला आहे मात्र या शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांना कुठलाही घाम फुटला नाही ते फक्त चालढकल करण्यात मग्न असल्याचे दिसून आले . त्यामुळे काल दिनांक 8 जून रोजी शिक्षण निरीक्षक मोरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापक यांना वेतन देयक सादर करण्याचे आदेश दिले होते हे मात्र तरीही मुख्याध्यापकांनी वेतन देयक देण्यास नकार दर्शविल्याने आज सोलापूर शिक्षणाधिकारी यांनी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन देयक स्वीकारू नये असे आदेश पारित केले आहेत.