पायाचे ठसे व विष्ठेवरुन सांगली वनविभागाचा दावा
कुपवाड / प्रतिनिधी
तासगांव ते तानंग रस्त्यावरील मानमोडी फाटयाजवळच्या ओढयालगत शुक्रवारी रात्री बिबटया आल्याच्या चर्चेने परिसरात भितीचे वातावरण पसरले. मात्र, पायाचे ठसे आणि विष्ठेवरुन तानंगमध्ये दिसलेला बिबटया न्हवे, तर तरस आहे, असा दावा सांगलीच्या वनविभागाने केला आहे. खात्रीशिर माहिती नसताना बिबटयाबाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जावू नये, असे आवाहन सांगलीच्या वन अधिकाऱ्यांनी केले आहे.
सांगलीच्या राजवाडा चौकात महिन्यापूर्वी बिबटया सापडल्याची बातमी ताजी असतानाच कसबे डीग्रज आणि अलकुड़ परिसरातही काही दिवसांपूर्वी बिबटया आढळला होता. त्यामुळे सांगलीकर चांगलेच धास्तावले आहेत. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तासगांव वरुन तानंग फाटा मार्गे मिरजेकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर दुचाकीवरील दोघा कामगारांना मानमोडी फाटयाजवळ बिबटयासदृश प्राणी दिसला. त्यानंतर लगेचच तानंग हद्दीत बिबटया शिरल्याची अफवा सर्वत्र पसरली. याबाबतच्या अफवेने मानमोडी, सावळी, तानंग, कानड़वाड़ी व कुपवाड एमआयडीसी परिसरात भितीचे वातावरण पसरले. भितीने नागरिक घराबाहेरही पडत न्हवते. याबाबतची माहिती काही लोकांनी सांगली वनविभगाला दिली. त्यानुसार उप वनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांसह पथकाने शुक्रवारी रात्री ज्याठिकाणी बिबटयासदृश प्राणी दिसला. त्या परिसराची पाहणी केली. रात्रभर गस्त घालत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने पुन्हा बिबटया दिसलेल्या परिसराची पाहणी केली. यावेळी तानंग हद्दीत ओढयाच्या ठिकाणी परिसरातील चिकन सेंटरचा टाकावू कचरा टाकला जातो, त्याठिकाणी तरस या प्राण्याच्या पायाचे ठसे व विष्टा असल्याचे वन पथकाच्या निदर्शनास आले. यावरुन हा वन्यप्राणी बिबटया नसून तरस असल्याचे समोर आले, अशी माहिती, सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी व वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी दिली.
तानंग परिसरात बिबटया शिरल्याची अफवा शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी सोशल मीडियावर आणि काही माध्यमांवर फोटोसहित व्हायरल झाली. काही माध्यमात तरस या प्राण्याच्या पायाचे ठसे असल्याचा फोटो हा बिबटयाच्या पायाचा फ़ोटो आहे, असे भासवले आणि बिबटया आल्याची अफवा पसरली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले. अशा अफवांवर आणि चुकीच्या बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि घाबरुन जावू नये. वन्य प्राण्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ यावर संपर्क साधावा. तसेच अशा चुकीच्या बातम्या वन विभागाकडून खात्री न करता प्रसारीत करू नये, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.