वृत्तसंस्था/ चेन्नई
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तामिळनाडूत 11 वैद्यकीय महाविद्यालये तसेच चेन्नईच्या सेंट्रल इन्स्टीटय़ूट ऑफ क्लासिकल तमिळच्या नव्या कॅम्पसचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होणार आहेत.
4000 कोटी रुपयांच्या खर्चातून स्थापन करण्यात आलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयांसाठी केंद्र सरकारने 2,145 कोटी रुपयांचा निधी दिला होता. मागील 7 वर्षांमध्ये देशातील वैद्यकीय जागांच्या संख्येत 80 टक्क्यांची भर पडली आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरून वाढत 596 झाली आहे.
विरुधुनगर, नामक्कल, नीलगिरी, तिरुपूर, तिरुवल्लूर, नागपट्टणम, डिंडीगुल, कल्लाकुरिची, अरियालूर, रामनाथपुरम आणि कृष्णागिरी जिल्हय़ांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
वैद्यकीय शिक्षणाच्या 1450 जागांची क्षमता असलेली ही वैद्यकीय महाविद्यालये केंद्र सरकारकडून पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली ओत. या योजनेच्या अंतर्गत ज्या जिल्हय़ात सरकारी किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात येत आहे.
चेन्नईमध्ये सीआयसीटीच्या एका नव्या कॅम्पसची स्थापना भारतीय वारशाचे रक्षण, संरक्षण आणि शास्त्राrय भाषांना चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. सीआयसीटी कॅम्पसची निर्मिती 24 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आली आहे.