पहिले-दुसरे रेल्वेगेटमार्गे वळविली वाहतूक : उद्या सायंकाळपर्यंत चालणार काम
प्रतिनिधी/ बेळगाव
टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेटच्या रेल्वेमार्ग दुपदरीकरणाच्या कामाला शनिवारी सकाळपासून सुरुवात करण्यात आली. रेल्वेगेट बंद असल्याने या मार्गावरील रस्ते वाहतूक पहिले व दुसरे रेल्वेगेटमार्गे वळविण्यात आली. सकाळच्यावेळी उद्यमबाग येथे कारखान्याला जाणाऱयांची संख्या अधिक असल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
रेल्वेमार्ग दुपदरीकरणाच्या प्राथमिक कामाला शनिवारी सकाळपासून सुरुवात करण्यात आली. जेसीबीने काँक्रीट फोडून त्यानंतर ट्रक घालण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. एक्स्प्रेसची वाहतूक सुरू असल्यामुळे या कामाला काहीसा विलंब होत आहे. सोमवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुरुस्ती काम सुरू असणार आहे. रेल विकास निगमकडून हे प्राथमिक काम केले जात आहे.
अनगोळ कॉर्नर येथे बॅरिकेड्स
अवजड वाहने अडकून दुसरे रेल्वेगेट येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रहदारी पोलिसांकडून अनगोळ कॉर्नर येथे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मोठी वाहने पहिले रेल्वेगेटमार्गे सोडण्यात येत आहेत. तर दुसऱया रेल्वेगेटमार्गे लहान कार व दुचाकी सोडण्यात येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गोवावेस येथून पहिले रेल्वेगेट येथून काँग्रेस रोड असा प्रवास करावा लागत होता.
सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी
बेळगावची औद्योगिक वसाहत असणाऱया उद्यमबाग येथे शेकडो कामगारांची ये-जा असते. सकाळी 8 ते 9 यावेळेत मोठय़ा संख्येने कामगार पहिले रेल्वेगेट, दुसरे व तिसरे रेल्वेगेटमार्गे उद्यमबाग गाठत असतात. तिसरे रेल्वेगेट बंद असल्याने कामगारांना दुसरे रेल्वेगेट ओलांडून उद्यमबाग गाठावे लागले. दुसरे रेल्वेगेट येथे गर्दी झाल्यामुळे काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली. कामगारांना वेळेत कामावर पोहोचता न आल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती.