आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप- भारताची एकूण 12 पदके निश्चित
वृत्तसंस्था/ दुबई
येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या तीन महिलांसह आणखी चार बॉक्सर्सनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवित पदके निश्चित केली आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत भारताची एकूण 12 पदके निश्चित झाली आहेत.
संजीत (91 किलो गट), साक्षी (54 किलो), जस्मिन (57 किलो) आणि सिमरनजीत कौर (60 किलो) या चार जणांनी उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी पुरुष विभागात शिवा थापाने (64 किलो) उपांत्य फेरी गाठत सलग पाचवे पदक निश्चित केले आहे. या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला, त्याचवेळी भारताची 7 पदके निश्चित झाली होती, त्यात सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमचाही (51 किलो गट) समावेश आहे.
इंडिया ओपनमध्ये सुवर्ण मिळविलेल्या संजीतने पुरुष विभागात ताजिकिस्तानच्या जसुर कुर्बोनोव्हचा 5-0 असा पराभव करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. उपांत्य फेरीत त्याचा मुकाबला उझ्बेकच्या संजार तुर्सुनोव्हविरुद्ध होणार आहे. तो मागील वेळचा रौप्यजेता असून यावेळी त्याला येथे तिसरे मानांकन देण्यात आले आहे. मंगळवारी उशिरा झालेल्या लढतीत भारताच्या शिवा थापाने सलग पाचव्यांदा पदकाच्या फेरीत स्थान मिळविले आहे. त्याने कुवैतच्या नादेर ओदाहचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. त्याची पुढील लढत विद्यमान विजेता व अग्रमानांकित ताजिकिस्तानच्या बाखोदुर उस्मोनोव्हशी होणार आहे. उस्मोनोव्हने जॉन पॉल पनुयानचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे. थापाने याआधी 2013 मध्ये सुवर्ण, 2015 व 2019 मध्ये कांस्य, 2017 मध्ये रौप्यपदक मिळविले आहे. येथे पदक निश्चित करून तो या स्पर्धेच्या इतिहासातील भारताचा सर्वात यशस्वी बॉक्सर बनला आहे.
अन्य एका लढतीत राष्ट्रकुल कांस्यविजेत्या मोहम्मद हुसामुद्दिनला 56 किलो गटातील अतिशय चुरशीच्या लढतीत उझ्बेकचा विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन व मिरअझिझबेक मिर्झाहलिलोव्हकडून पराभव स्वीकारावा लागला. हुसामुद्दिनने जोरदार टक्कर दिली पण अखेरीस त्याला वर्ल्ड चॅम्पियनकडून 1-4 अशा फरकाने हार पत्करावी लागली.
महिला विभागात साक्षीने ताजिकिस्तानच्या रुहाफ्झो हकारझरोव्हावर 5-0 अशी एकतर्फी मात केली. कझाकच्या अग्रमानांकित दिना झोलामनशी तिची पुढील लढत होईल. 57 किलो वजन गटात जस्मिनने मंगोलियाच्या ओयुत्सेत्सेग येसुगेनवर 4-1 अशा गुणफरकाने मात केली. तिची उपांत्य लढत कझाकच्या व्लाडिस्लावा कुख्ताविरुद्ध होणार आहे. अलीकडेच कोरोना संसर्गातून बऱया झालेल्या सिमरनजितने महिलांच्या 60 किलो वजन गटाच्या लढतीत उझ्बेकच्या रायखोना कोडिरोव्हाला 4-1 असे नमवित आगेकूच केली. तिची पुढील प्रतिस्पर्धीही कझाकचीच असून रिम्मा व्होलोसेन्को असे तिचे नाव आहे.