जर्मनीतील देशाचे राजदूत मुस्तफा अदीब होणार पंतप्रधान
वृत्तसंस्था/ बैरुत
जर्मनीतील लेबनॉनचे राजदूत मुस्तफा अदीब यांना देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी मिळणार आहे. लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये 4 ऑगस्ट रोजी झालेल्या अत्यंत तीव्रस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान हसन दियाब यांनी स्वतःच्या पूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिला होता. अदिब हे 128 पैकी 90 खासदारांची मते प्राप्त करण्यास यशस्वी ठरल्याचे समजते.
खासदारांच्या बैठकीत अदीब यांना माजी पंतप्रधानांचीही साथ मिळाली आहे. अदीब यांनी बाबदा पॅलेसमध्ये राष्ट्रपती मिशेल एउन यांची भेट घेतली आहे. ही देशासाठी काम करण्याची वेळ आहे. लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा आशा निर्माण करण्यासाठी सर्व पक्षांना मिळून काम करावे लागणार असल्याचे अदीब यांनी म्हटले आहे. लोक स्वतःचे वर्तमान आणि भविष्यावरून चिंतेत पडले आहेत. आम्ही देशाचा विकास आणि वेगवान सुधारणा व्हावी याकरता तज्ञ लोकांसोबत सरकार स्थापन करू, असे उद्गारही त्यांनी काढले आहेत.
बैरुत येथील स्फोटानंतर लोकांनी पंतप्रधान हसन दियाब यांच्या विरोधात अनेक दिवसांपर्यंत उग्र निदर्शने केली होती. या निदर्शनांमुळे दियाब यांन मंत्रिमंडळासह 11 ऑगस्ट रोजी राजीनामा द्यावा लागला होता. दियाब हे जानेवारी महिन्यातच पंतप्रधान झाले होते. त्यांच्या सरकारवर जनतेकडून भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. राष्ट्रपती मिशेल एउन यांनी नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेपर्यंत दियाब यांच्या सरकारला काळजीवाहूची भूमिका पार पाडण्यास सांगितले होते.
बैरुतमध्ये प्रचंड स्फोट
बैरूत बंदरावर शिपमेंटमध्ये 2,750 टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला होता. या स्फोटात 190 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 6,500 लोक जखमी झाले होते. स्फोटाची तीव्रता अधिक असल्याने त्याचा प्रभाव 240 किलोमीटर अंतरापर्यंत जाणवला होता. या स्फोटामुळे 3 अब्ज डॉलर्सचे (22,540 कोटी रुपये) नुकसान झाले होते. तसेच शहरातील 3 लाख लोक बेघर झाले आहेत.
अदीब यांची ओळख
अदीब हे 2013 पासून जर्मनीत लेबनॉनचे राजदूत म्हणून कार्यरत होते. माजी पंतप्रधान नजीब मिकाती यांचे ते सल्लागारही राहिले आहेत. लेबनॉनच्या राजकीय आणि संप्रदाय व्यवस्थेच्या अंतर्गत केवळ सुन्नी मुस्लीमच पंतप्रधान होऊ शकतो.