प्रतिनिधी / खेड
कोकण रेल्वे मार्गावर तुतारी विशेष गाडी शनिवारपासून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळालेला असतानाच या गाडीसाठी २४ सप्टेंबरपासून आरक्षण देखील खुले झाले आहे. या विशेष गाडीतून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. कोकण मार्गावर दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला होता. रेल्वे प्रशासनाने ही मागणी मान्य केली. २६ सप्टेंबरपासून तुतारी एक्सप्रेस कोकण मार्गावर नियमितपणे धावणार आहे. सलग पाच दिवस तुतारी एक्सप्रेस मान्सूनच्या वेळापत्रकानुसार धावणार असून १ नोव्हेंबरपासून नॉन-मान्सून वेळापत्रकानुसार धावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना कोविड संबंधी असलेल्या शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व प्रवाशांसाठी बंधनकारक आहे. तुतारी एक्सप्रेस धावणार असल्याने मुंबईस्थित कोकणवासियांनी सुटकेचा नि:श्वास टाकलेला असतानाच या गाडीसाठी गुरूवारपासून आरक्षणही खुले झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.