आसनसोल / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँगेसचा आमदार नरेन चक्रवर्ती याने मतदारांनाच धमकी दिल्याचा व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ज्यांना भाजपला मतदान करायचे आहे, त्यांनी ते त्यांच्या जबाबदारीवर आणि परिणामांचा विचार करुन करावे, अशी धमकी त्याने दिल्याचे दिसून येते. राज्याच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीसाठी प्रचार करताना, या आमदाराने ही प्रक्षोभक भाषा वापरली आहे. तृणमूल काँगेसने या मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने या संदर्भात तृणमूल काँगेसला धारेवर धरले आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडली असून आमदारच उघडपणे मतदारांना धमकावत आहेत. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा. तसेच मतदानाच्या वेळी सर्व मतदानकेंद्रांवर वाढीव सुरक्षा व्यवस्था द्यावी अशी मागणी राज्य भाजपच्या नेत्यांनी केली आहे. आसनसोल मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँगेस यांच्यात थेट स्पर्धा आहे.