ऑनलाईन टीम / तेलंगणा :
तेलंगणातील भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत 8 कर्मचारी अडकले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही आग लागली.
तेलंगणातील श्रीशैलम धरणावरील किनाऱ्यावर हा भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे. या प्लांटमध्ये सहा पॉवर जनरेटर आहेत. चौथ्या पॅनेलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. तेथील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने उग्र रूप धारण केल्याने आग विझवणे अशक्य झाले.
आग लागली तेव्हा या पॉवर प्लांटमध्ये तेलंगण राज्य वीज निर्मिती महामंडळाचे 25 कर्मचारी काम करत होते. त्यामधील काही कर्मचाऱ्यांची एनडीआरएफच्या पथकाने सुटका केली आहे. मात्र, 8 कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.