चीनने एकाचवेळी पाठविली 52 लढाऊ विमाने
वृत्तसंस्था/ तैपैई
चिनी सैन्याने अरेरावीच्या सर्व मर्यादा ओलांडत तैवानच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये सोमवारी एकाचवेळी 52 लढाऊ विमाने पाठविली आहेत. त्यानंतर आणखीन 4 लढाऊ विमाने पाठविण्याचे कृत्य चीनने केले आहे. मागील 4 दिवसांमध्ये चीनने आतापर्यंत 149 लढाऊ विमाने तैवानच्या हवाईहद्दीत घुसविली आहेत. चीनच्या या अरेरावीला प्रत्युत्तर म्हणून तैवानने युद्धाच्या तयारीची घोषणा केली आहे. चीन आणि तैवान यांच्यातील तणावामुळे दक्षिण चीन समुद्रात युद्धाचे ढग घोंगावू लागले आहेत.
आमचा देश आता चीनसोबतच्या युद्धाची तयारी करत असल्याचे म्हणत तैवानचे विदेशमंत्री जोसेफ वू यांनी ऑस्ट्रेलियाकडून मदत मागितली आहे. गोपनीय माहिती पुरविण्याच्या कार्याला गती देत सुरक्षा सहकार्य करा असे आवाहन तैवानने ऑस्ट्रेलियाला केले आहे.
अखेरच्या श्वासापर्यंत लढू
चीनने खरोखरच हल्ला केल्यास तैवानला त्याला ठोस प्रत्युत्तर देण्यासाठी स्वतःला सज्ज करणार आहे. तैवानची सुरक्षा आमच्याच हातात असून आम्ही याप्रकरणी पूर्णपणे प्रतिबद्ध आहोत. चीनने युद्ध सुरू केल्यास आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढू असे उद्गार तैवानच्या विदेशमंत्र्यांनी काढले आहेत.
भयभीत करण्याचा उद्देश
चीनने हल्ला केल्यास त्यालाही मोठे नुकसान झेलावे लागेल असे जोसेफ यांनी म्हटले आहे. मागील 4 दिवसांपासून तैवानला भयभीत करण्याच्या उद्देशाने चीन सातत्याने स्वतःची लढाऊ विमाने पाठवत आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयानुसार या लढाऊ विमानांमध्ये 34 जे-16 लढाऊ विमान आणि 12 एच-6 अण्वस्त्रवाहू विमाने होती.
चीनने कारवाई रोखावी
तैवानच्या वायुदलाने चीनच्या लढाऊ विमानांना पिटाळून लावले आहे. तैवानच्या विरोधात सैन्य, कूटनीतिक आणि आर्थिक दबाव तसेच बळजबरीचे कारवाई बंद करावी अशी विनंती आम्ही चीनला करत आहोत असे अमेरिकेच्या विदेश विभागाने म्हटले आहे.