जीवनावश्यक वस्तू आणणाऱया वाहन चालकांची चेकनाक्यावर तपासणी करा!
कुडाळ तालुका शांतता समितीच्या बैठकीत मागणी
कामगारांसह खरेदीसाठी येणाऱयांच्या दुचाकीला परवानगी द्या!
धार्मिक कार्यक्रमांसाठी एकत्रित येऊ नका-पोलिसांचे आवाहन
वार्ताहर / कुडाळ:
जिल्हय़ात अत्यावश्यक सेवेचे साहित्य घेऊन येणाऱया परजिल्हय़ातील वाहनांवरील चालक, क्लीनर यांची जिल्हा सीमेवरील चेकपोस्टवर आरोग्य तपासणी करून प्रवेश द्या. शहरात जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी येणाऱया ग्राहक व किरकोळ व्यापाऱयांना वाहने उभी करून बाजारपेठेत चालत यावे लागते. त्यांची फरफट थांबविण्यासाठी त्यांना वाहने आत आणण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कुडाळ येथे झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत करण्यात आली.
जिल्हय़ात बेकायदेशीर प्रवेश करणाऱया व्यक्तींची माहिती प्राप्त होताच संबंधित विभागाला तात्काळ कळवावे. लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी (सावंतवाडी) शिवाजी मुळीक व कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी करून काही मार्गदर्शक सूचनाही केल्या.
शांतता कमिटीची बैठक येथील पोलीस ठाण्यात मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. कोरे यांच्यासह कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे, नगरसेवक गणेश भोगटे, एजाज नाईक, राकेश कांदे व महेंद्र वेंगुर्लेकर, नगरसेविका संध्या तेर्से, कुडाळ-एमआयडीसी औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, माजी सभापती सुनील भोगटे, मुस्लिम समाज संघटनेचे मुश्ताक शेख, कौसर खान, सिराज शहा, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, ऍड. आनंद गवंडे, नीलेश तेंडुलकर, विद्याधर कुडाळकर, पोलीस पाटील रामदास चव्हाण आदी उपस्थित होते.
चालक, क्लीनरचीही तपासणी करा!
सिंधुदुर्गात बाहेरील जिल्हय़ातून भाजी, दूध, किराणा, मेडिसीन आदी अत्यावश्यक माल घेऊन वाहने येतात. त्या वाहनावरील चालक तसेच क्लिनर आणि कामगार असेल, तर त्यांची जिल्हय़ाच्या सीमेवरील चेकपोस्टवर आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करूनच त्या वाहनांना प्रवेश द्यावा. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हय़ात होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी संजय भोगटे यांनी केली.
…अन्यथा स्वयंसेवकांमार्फत ग्राहकांना सेवा द्या!
शहरात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी येणारे ग्राहक व किरकोळ व्यापाऱयांना दुचाकी वाहने उभी करून चालत यावे लागते. सामान डोक्यावर घेऊन उन्हातून वाहनापर्यंत जाण्यासाठी त्यांची फरफट होते. खरेदीसाठी येणाऱया ग्राहकांना दुचाकी आत आणण्यासाठी परवानगी देण्यात यावी किंवा प्रशासनाने स्वयंसेवकांमार्फत त्यांना घरपोच सुविधा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कामगारांना दुचाकी नेण्यास परवानगी द्या!
औद्योगिक वसाहतीमधील उद्योग सुरू करण्यात सवलत दिली आहे. 50 टक्के कामगार असावेत, अशी अट आहे. ग्रामीण भागातील हे कामगार असून त्यांना कामावर येण्यासाठी दुचाकीची परवानगी मिळावी, अशी मागणी आनंद बांदिवडेकर यांनी करून तालुका खरेदी-विक्री संघ सोमवारचा बंद असल्याने मंगळवारी ग्राहकांची तेथे गर्दी होते. सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यासंदर्भात सूचना कराव्यात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
चेकपोस्टवर वाहनांची तपासणी
गोवा परवाना असलेली वाहने शहरात फिरतात. पण त्या वाहनांची तपासणी होत नाही, याकडे गणेश भोगटे यांनी लक्ष वेधले. त्यावर स्थानिकांची गोवा परवान्याची वाहने आहेत, असे कोरे यांनी सांगितले. जिल्हय़ाच्या सीमा बंद असून तेथील चेकपोस्टवर वाहनांची तपासणी केली जाते. वैद्यकीय सेवेच्या परवानगीशिवाय अन्य कुठल्याही वाहनांना प्रवेश दिला जात नाही, असे मुळीक यांनी स्पष्ट केले.
अंतर राखण्यासाठी दुकानांसमोर कॉलम आखा!
बाजारपेठेत काही व्यापारी आपल्या दुकानाच्या मागील भागात वास्तव्यास आहेत. त्यामुळे दुकानाचे शटर उघडल्याशिवाय पर्याय नाही. पोलिसांनी त्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. शहरात भाजी, चिकन दुकानावर गर्दी असते. ती कमी करण्यासाठी एक मीटरचे अंतर ठेवून ग्राहक खरेदी करतील, यासाठी प्रयत्न व्हावेत, याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर अशा दुकानांसमोर ग्राहकांसाठी कॉलम आखून देण्यासाठी प्रयत्न करू, असे तेली यांनी सांगितले.
धार्मिक कार्यक्रमांना एकत्र जमू नये!
संचारबंदीचा आदेश लागू आहे. लोकांनी धार्मिक कार्यक्रमांना एकत्र जमू नये. गर्दी केल्यास शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होऊ शकते. शासनाचे निर्देश व सूचनांचे पालन करून जनतेने प्रशासन व पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मुळीक व कोरे यांनी केले. मुस्लिम बांधवांचा पुढील महिना ‘रोजा’ महिना आहे. त्यामुळे मशिदीत जाऊन सार्वजनिक नमाज पठण करू नये, असेही कोरे यांनी सांगितले. शांतता कमिटीने पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.