प्रतिनिधी
पणजी, मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात उपचार घेणाऱया नऊ जणांचा अहवाल बुधवारी निगेटिव्ह आला होता. त्यांना काल गुरुवारी कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. काल अन्य एकाची चाचणी घेण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याला उद्या डिस्चार्ज दिला जाणार आहे. सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये 32 जणांवर उपचार सुरू आहेत.
कोविड हॉस्पिटलमधून आतापर्यंत 37 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. गोव्यात सापडलेल्या कोरोना बाधितांची संख्या 69 आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण शेजारील राज्यातून आले होते. अद्याप एकही स्थानिक गोवेकर कोरोना बाधित झालेला नाही. काल दिवसभरात एकही नवीन रूग्ण कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाला नव्हता, अशी माहिती कोविडच्या डॉक्टरांनी दिली.
गुरुवारी 866 जणांचे नमुने निगेटिव्ह
गुरुवारी एकूण 983 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील 866 जणांचे नमुने निगेटिव्ह मिळाले आहेत. इटलीतून गोव्यात आलेले 416 खलाशी सध्या विलगीकरणात असून त्यांचे 7 दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण संपले असले तरी गृह विलगीकरणाचे 7 दिवस बाकी आहेत. सध्या 218 जण संस्थात्मक विलगीकरणात असून दोघेजण आयसोलेशन वॉर्डात संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले आहेत. त्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे.
बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासा
गोव्यात अजूनही बाहेरुन आलेल्या प्रवाशांमध्ये कोणीतरी पॉझिटिव्ह सापडत असून काही रुग्ण उपचारानंतर बरेही होत आहेत. बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने ती एक दिलासा देणारी गोष्ट आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, गोव्यात बाहेरुन येणाऱया प्रवाशांचे प्रमाण वाढत असून त्यातील काहीजण पॉझिटिव्ह मिळाल्याची व रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या 32 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सर्व रुग्ण उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. मधुमेह व वयस्क रुग्ण हे जरा क्रिटिकल म्हणून बघितले जात असले तरी त्यांच्याकडून देखील वैद्यकीय उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोविड हॉस्पिटलमध्ये नव्याने रुग्ण येण्याचे प्रमाण कमी झाल्याने, डॉक्टर, नर्सेस तसेच इतर कर्मचाऱयांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या रविवारी एकाच दिवशी 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे राज्यात प्रचंड खळबळ माजली होती. राजधानी एक्सप्रेसमधून आलेल्या प्रवाशांमुळे ही संख्या वाढली होती. खुद्द कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी देखील नाराजीचा सूर व्यक्त केला होता. आत्ता स्थिती पूर्वपदावर येत असल्याने डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले आहे.