प्रतिनिधी/ बेळगाव
उंबरजनजीक भोसलेवाडी (ता. कराड) जवळ कार अपघातात मृत्युमुखी पडलेले डॉक्टर दांपत्य बेळगाव येथील असून त्यांच्यावर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. अमित आप्पाजी गावडे (वय 38) व डॉ. अनुजा अमित गावडे (वय 35) अशी त्यांची नावे आहेत. ते मूळचे नानावाडी येथील राहणारे होते. सध्या नोकरीनिमित्त पुणे येथे त्यांचे वास्तव्य होते. नानावाडी येथील आप्पाजी (बाबी) गावडे यांचा डॉ. अमित व्दितीय सुपुत्र तर अशोक गावडे यांचा पुतण्या होता.
डॉ. अमित यांच्या पश्चात आई-वडिल, पाच वर्षाचा मुलगा, भाऊ, भावजय, काका, काकी असा परिवार आहे. मुलांना आणण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरला जाताना हा अपघात घडला आहे. शनिवारी सायंकाळी या डॉक्टर दांपत्यावर सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. अनुजा या निट्टूर (ता. चंदगड) येथील सुभेदार शिवाजी पाटील यांची कन्या होत. या दांपत्याच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे.