नगराध्यक्षांची माहिती : चौकशीत तालुका आरोग्य अधिकारी मात्र अनभिज्ञः
सेना विभागप्रमुखांनी माहिती घेऊनच टीका करावी
प्रतिनिधी / देवगड:
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱयांच्या बंद स्थितीतील शासकीय निवासस्थानात टाकण्यात आलेला कचरा हा देवगड कोविड सेंटरचाच आहे. हा कचरा न. पं. ने टाकलेला नाही. या कचऱयामध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात आलेली इंजेक्शन व इतर टाकाऊ वस्तू आहेत. या बाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱयांनाही नव्हती. तसेच कोविड रुग्णालय प्रशासनाने याची माहिती न. पं. लाही दिलेली नव्हती. त्यामुळे शिवसेनेचे विभागप्रमुख तुषार उर्फ पीटी पेडणेकर यांनी या प्रकाराची संपूर्ण माहिती घेऊनच न. पं. वर टीका करावी, असा टोला नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांनी लगावला आहे.
साळसकर यांनी सांगितले, देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱयांच्या बंद स्थितीतील शासकीय निवासस्थानात कचरा डम्पिंग होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर शुक्रवारी तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष कोंडके यांना नगरपंचायत कार्यालयात बोलाविण्यात आले होते. यावेळी न. पं. मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, नगरसेवक नीरज घाडी, उमेश कणेरकर, योगेश चांदोसकर, नगरसेविका प्रणाली माने, उमेश स्वामी, आरोग्य विभाग कर्मचारी आदी उपस्थित होते. डॉ. कोंडके यांनी डॉक्टरांच्या बंद स्थितीतील शासकीय निवासस्थानात कोविड केअर सेंटरचा कचरा डंपिंग करण्यात येत असल्याची कल्पना आपल्याला नव्हती, असे सांगितले. यावर या कचरा डंपिंगमध्ये इंजेक्शन व इतर टाकाऊ वस्तू असून हा विषय देवगड ग्रामीण रुग्णालयाशी संबंधित आहे. तेथे नगर पंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा कचरा डंपिंग केला जात नाही. हा कचरा ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधून तेथे डंपिंग केला जात असेल, तर त्याची माहिती आरोग्य विभागाकडून न. पं. प्रशासनाला देणे आवश्यक होते. मात्र, ही माहिती आरोग्य विभागाने न. पं. ला दिलेली नसल्याने न. पं. वर आरोप होत आहेत. हे पूर्णतः चुकीचे आहे. देवगड कोविड सेंटरमधील कचरा व स्वच्छता करण्याची जबाबदारी न. पं. ची राहील. मात्र, आरोग्य विभागाने आपल्याकडील टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट स्वतःच लावायची आहे, अशी सूचना न. पं. कडून तालुका अधिकाऱयांना करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा साळसकर यांनी दिली.