रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्रीची पुन्हा अनुमती : जगभरात 78,95,823 कोरोनाबाधित : 4 लाख 32 हजारांपेक्षा अधिक बळी
जगभरात कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 4,32,882 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर बाधितांचे प्रमाण 78 लाख 95 हजार 823 वर पोहोचले आहे. कोरोना संसर्गावर आतापर्यंत 40 लाख 56 हजार 070 जणांनी यशस्वी मात केली आहे. थायलंडमध्ये 15 जूनपासून संचारबंदी मागे घेतली जाणार आहे. याचबरोबर तेथील रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री करण्याची अनुमती पुन्हा दिली जाणार आहे. थायलंडमध्ये 3 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडले असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. थायलंडने आतापर्यंत संसर्गावर चांगले नियंत्रण मिळविले आहे.
बीजिंग : प्रशासन दक्ष
3 दिवसांमध्ये 57 स्थानिक रुग्ण आढळून आल्यावर चीनच्या राजधानी बीजिंगमध्ये पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 3 घाऊक बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्याशी संबंधित 10 हजार लोकांची चाचणी केली जात आहे. मुखपट्टा आणि सॅनिटायजरचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. अधिकाऱयांनी याला संसर्गाची दुसरी लाट म्हणणे टाळत धोका वाढत असल्याचे संकेत दिले आहेत.
संचारबंदी शक्य
बीजिंगमध्ये वाढते रुग्ण पाहता सरकार कठोर पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. तेथे पूर्ण शहर किंवा त्याच्या काही भागांमध्ये सोमवारपासून संचारबंदी लागू केली जाऊ शकते. परंतु प्रशासनाने यासंबंधी अद्याप टिप्पणी केलेली नाही. एक आठवडय़ात संसर्ग फैलावलेल्या 3 बाजारपेठांमध्ये गेलेल्या लोकांना स्वतःहून समोर येत चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे. बीजिंगमधील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
इजिप्त : रुग्ण वाढतेच
मागील 24 तासांमध्ये इजिप्तमध्ये 1,677 नवे रुग्ण सापडले असून 62 जणांना कोरोना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. देशातील बाधितांचा आकडा आता 42 हजार 980 झाला आहे. इजिप्तमध्ये 1,484 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. देशाच्या काही भागांमध्ये नवे क्लस्टर समोर आले आहेत. या भागांवर नजर ठेवली जात असून लवकरच कठोर निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असे सरकारने म्हटले आहे.
इस्रायल : पुन्हा निर्बंध
इस्रायलने बऱयाच अंशी कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविले होते. मागील आठवडय़ात तेथे शाळा, व्यवसाय, बार आणि हॉटेल्स सुरू करण्यात आली होती. परंतु इस्रायलमध्ये आता रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 177 शाळा पुन्हा बंद केल्या जाऊ शकतात, असे सरकारने सांगितले आहे. मागील एक आठवडय़ात तेथे 493 विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार जुलै महिना संसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
ब्राझील : 42 हजार बळी
ब्राझीलमध्ये रुग्णांची संख्या 8 लाख 50 हजार 796 झाली आहे. तर बळींचे प्रमाण 42,791 वर पोहोचले आहे. 24 तासांमध्ये 21,704 नवे बाधित सापडले असून 892 जणांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णसंख्येप्रकरणी ब्राझील अमेरिकेनंतर दुसऱया स्थानी आहे. तसेच बळींप्रकरणी ब्राझील दुसऱया क्रमांकावर आहे.
मंत्र्याचा मृत्यू
कोरोना विषाणूमुळे बांगलादेशातील एका मंत्र्याचा मृत्यू झाला आहे. ढाका येथील कंबाइंड मिलिट्री हॉस्पिटलध्ये शनिवारी रात्री धार्मिक विषयक उपमंत्री शेख अब्दुल्ला यांचे निधन झाले आहे. तत्पूर्वी माजी आरोग्यमंत्री मोहम्मद नसीम यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. सद्यकाळात अन्य दोन मंत्र्यांवर उपचार सुरू आहेत.
नेपाळ : सरकारवर टीका
नेपाळमध्ये सरकारच्या विरोधात जनतेत संताप निर्माण झाला आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास अपयश आल्याने लोकांनी सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत. पोलिसांनी काही निदर्शकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या निदर्शकांमध्ये 7 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत 5,335 रुग्ण सापडले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
मोहिमेचे भारताकडून नेतृत्व
संयुक्त राष्ट्रसंघात भारत आणि अन्य 12 देशांनी कोरोना संसर्गासंबंधी चुकीच्या माहितीला तोंड देण्यासाठी तथ्यात्मक सामग्रीचा प्रचार करण्याच्या उद्देशाने एका पुढाकाराचे नेतृत्व केले आहे. ऑस्ट्रेलिया, चिली, फ्रान्स, जॉर्जिया, भारताच्या या पुढाकारानुसार एकूण 132 सदस्य देशांनी अफवा रोखण्याच्या मोहिमेचे समर्थन केले आहे.