फ्रेंचओपन ग्रँडस्लॅम : क्लारा, स्वायटेक, मुगुरुझा विजयी
वृत्तसंस्था/ पॅरिस
तिसरा मानांकित डॉमिनिक थिएम सर्वोत्तम फॉर्ममध्ये नव्हता, तरीही त्याने नॉर्वेच्या कॅस्पर रुडवर मात करीत फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची चौथी फेरी गाठण्यात यश मिळविले. याशिवाय स्टेफानोस सित्सिपस, ऍलाझ बेडेने, रॉबर्टो कारबालेस यांनी तर महिलांमध्ये सिमोना हॅलेप, इलिना स्विटोलिना यांनीही चौथी फेरी गाठली. तसेच फ्रान्सची युवा खेळाडू क्लारा बुरेल, स्वायटेक, स्पेनची पॉला बडोसा, माजी विजेती गार्बिन मुगुरुझा यांनी तिसरी फेरी गाठली. क्रिस्टिना प्लिस्कोव्हा, एकतेरिना अलेक्झांड्रोव्हा, एलिस मर्टेन्स, युजीन बुचार्ड, डेनिस शॅपोव्हॅलोव्ह, स्लोअन स्टीफेन्स यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले.
पुरुष एकेरीत तिसऱया मानांकित थिएमला पहिल्या सेटमध्ये सर्व्हिसची समस्या आली. पण नंतर त्याने आपला खेळ उंचावला आणि रुडवर 6-4, 6-3, 6-1 अशी मात केली. चौथ्या फेरीत त्याची लढत वावरिंका किंवा हय़ुगो गॅस्टनशी होईल. पाचव्या मानांकित सित्सिपसने सफाईदार खेळ करीत उरुग्वेच्या पाब्लो क्युवासचा 7-1, 6-4, 6-2, बेडेनेने निकोला मिलोविकचा 7-5, 2-6, 6-1, 7-6 (7-4) असा पराभव करून आगेकूच केली. कॅनडाच्या नवव्या मानांकित शॅपोव्हॅलोव्हला मात्र रॉबर्टो कारबालोसकडून 7-5, 6-7 (5-7), 6-3, 3-6, 8-6 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. ग्रिगोर डिमिट्रोव्हनेही तिसरी फेरी गाठताना आंदेज मार्टिनवर 6-4, 7-6 (7-5), 6-1 अशी मात केली.
महिलांमध्ये अग्रमानांकित हॅलेपने अमांदा ऍनिसिमोव्हाचा 6-0, 6-1 असा धुव्वा उडवित चौथी फेरी गाठली. पोलंडच्या 19 वर्षीय इगा स्वायटेकने युजीन बुचार्डचे आव्हान 6-3, 6-2 असे संपुष्टात आणून शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. अन्य सामन्यात युक्रेनच्या तिसऱया मानांकित स्विटोलिनाने रशियाच्या अलेक्झांड्रोव्हाचा 6-4, 7-5, फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने एलिस मर्टेन्सचा, क्लारा बुरेलने स्लोव्हाकियाच्या काया जुवानचा 7-6 (8-6), 6-2, फिओना फेरोने कझाकच्या एलेना रीबाकिनाचा 6-3, 4-6, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. पॉला बडोसाने अमेरिकेच्या 29 व्या मानांकित व माजी विजेत्या स्लोअन स्टिफेन्सला 6-4, 4-6, 6-2 असा पराभवाचा धक्का दिला. स्पेनच्या गार्बिन मुगुरुझानेही तिसरी फेरी गाठताना झेकच्या क्रिस्टिना प्लिस्कोव्हावर 6-3, 6-2 अशी मात केली. डॅनीली कॉलिन्सशी तिची पुढील लढत होईल.