जिल्हयातील रुग्णांची संख्या 350 वर : रक्तातील गुणसुत्रीचा दुर्धर आजार
ब्लड ट्रान्सफयुजनसाठी 15 दिवसातून एकदा रक्ताची गरज तर बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी येतो 20 ते 25 लाखांचा खर्च
राजारामपुरी ग्रीन गोज’ने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी आदर्शवत कार्य : 16 वर्षात 12 हजारपेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन
नंदकुमार तेली / कोल्हापूर
थॅलेसेमिया हा रक्तातील गुणसुत्रीचा आजार असून ब्लड ट्रान्सफयुजनसाठी 15 दिवसातून एकदा रक्त चढवावे लागते. तर बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी सुमारे 20 ते 25 लाखांपर्यंतचा खर्च करावा लागतो. यामुळे हा आजार झालेल्या रुग्णाला खर्चिक औषधोपचार, आजाराशी झुंज देत खडतर जीवनप्रवास करावा लागतो. सध्या जिल्हयातील रुग्णसंख्या सुमारे 350 पेक्षा अधिक आहे.
रक्त व बोनमॅरो मॅच होणे अत्यावश्यक
जवळच्या नातेसंबंधात लग्न झालेल्या दांपत्यांच्या मुलांमध्ये बहुधा थॅलेसेमिया आजार होतो. असे तज्ञांच्या निदर्शनास आले आहे. हा आजार रक्ताच्या गुणसूत्रीचा आहे. 5 वर्षांच्या आतील लहान मुलांना हा आजार असेल तर नैसर्गिकदृष्टया आजार बरा होण्यास मदत होते. यासाठी रक्त व बोनमॅरो मॅच होणे आवश्यक आहे. रुग्णाच्या दृष्टीने बोनमॅरो बहीण, आई यांचे बोनमॅरो मॅच होणे अधिक चांगले असते. जर बोनमॅरो मॅच झालेच नाही तर आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱयांनाही रूग्णांवर उपचार करणे अशक्यप्राय बनते. बोनमॅरो ट्रान्सप्लांट सर्जरी येल्लूर, बेंगलोर येथील हॉस्पिटलमध्ये होते. सर्जरीनंतर रुग्णाला एक वर्षभर आयसोलेट रहावे लागते. त्यांचा धुळीपासून बचाव करून काळजी घ्यावी लागते. तसेच वयाने जास्त असलेल्या रुग्णांमध्ये रक्त वारंवार बदलल्याने रक्ताच्या गाठी झाल्याने सर्जरी करावी लागते. एकुणच थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाचा जीवनप्रवास हा खडतरच बनत जातो.
रुग्णासह कुटुंबीयांना मानसिक व आर्थिक हातभार
‘राजारामपुरी ग्रीन गोज’ या सामाजिक संस्थेने थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी मोफत रक्ताचा पुरवठा व्हावा, या उदात्त हेतूने गेल्या 16 वर्षात रक्तदान शिबीराच्या माध्यमातून सुमारे 12 हजारपेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. ट्रान्सफयुजनसाठी 15 दिवसातून एकदा चढवणे, बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचा खर्च आहे. यासाठी दानशूर संस्था, व्यक्तींनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रीन गोजतर्फे रुग्ण व त्यांच्या कुटूंबीयांना मानसिक आधार देऊन वैद्यकीय खर्चाचा हातभार लावण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे.
`राजारामपुरी ग्रीन गोज’चे मोलाचे योगदान
कोरोनाच्या काळात लॉक डाऊनमुळे रक्तदान शिबीरांचे प्रमाण कमी झाल्याने सर्वच रक्तपेढयांमध्ये रक्ताचा तुटवडा होता. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी `राजारामपुरी ग्रीन गोज’ या संस्थेतर्फे 22 मे 2020 रोजी लॉक डाऊन काळात आयोजीत रक्तदान शिबीरात सुमारे 387 पेक्षा अधिक रक्तपिशव्या तर काही दिवसांपूर्वी झालेल्या रक्तदान शिबीरात सुमारे 661 रक्तपिशव्यांचे संकलन केले आहे. या संकलित रक्तपिशव्या अर्पण रक्तपेढीत जमा करण्यात आल्या असून थॅलेसेमियाग्रस्तांना याचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. संस्थेचे दुर्गेश लिंग्रस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते वैद्यकीय सेवा-सुविधेसाठी अविरत परीश्रम घेत आहेत. संस्थेने गेल्या वर्षी एका रुग्णाची बोनमॅरो सर्जरीचा खर्च केला होता. तर यंदाच्या वर्षी 100 थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांना दत्तक घेतले असून बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी 5 रुग्णांची जबाबदारी उचलली आहे.