चौथ्या टप्प्यापूर्वी कल्बे जव्वाद यांचे वक्तव्य : सपला पोहोचणार नुकसान
उत्तरप्रदेशात आता चौथ्या टप्प्यातील मतदान नजीक आले असून यात लखनौसमवेत 9 जिल्हय़ांमधील 60 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. यात अवध क्षेत्रातील अनेक जिल्हय़ांचा समावेश आहे. याचदरम्यान शिया धर्मगुरु कल्बे जव्वाद यांचा एक व्हिडिओ समोर आल्यावर राजकीय समीकरणे बदलू शकतात. मौलानांनी दंगल-हिंसा रोखण्यास सक्षम पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जव्वाद यांनी स्वतःच्या व्हिडिओत कुठल्याही पक्षाचे नाव न घेता समाजवादी पक्षाला लक्ष्य पेले आहे. मुस्लिमांचा सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱया पक्षाने पूर्ण शिया समुदायाचा अपमान केला आहे. एका शिया नेत्याला उमेदवारी देत ती मागे घेतल्याचे जव्वाद यांनी म्हटले आहे.
उमेदवारी मागे घेतल्याने नाराज
जे मौलवी एका विशिष्ट पक्षाची पाठराखण करत आहेत, त्यांना कशाप्रकारे समुदायाचा अपमान करण्यात आला हे समजत नाही. एका शिया नेत्याला निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आणि 2 तासांनी ते मागे घेण्यात आले. एवढेच नाही तर संबंधिताला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. हा प्रकार सर्वांसमोर मांडण्यात यावे असे ते म्हणाले.
थेट उल्लेख टाळला
आम्ही लोक कुठल्याही विशेष पक्षाची पाठराखण करत नाही. जो आमच्या समुदायाच्या बाजूने असेल आणि जो दंगल-हिंसा रोखण्यास सक्षम असेल, त्यालाच मतदान करावे हेच आमचे म्हणणे आहे. काहींनी नेहमीच आम्हाला फसविले असल्याने त्यांना मतदान करणे म्हणजे स्वतःची फसवणूक करण्यासारखे असल्याचे म्हणत मौलाना कल्बे जव्वाद यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात समाजवादी पक्षाला लक्ष्य करत म्हटले आहे.
नाराजीचा बसू शकतो फटका
अवध क्षेत्रातील 21 जिल्हय़ांमध्ये सुमारे 118 मतदारसंघ असून चौथ्या टप्प्यातील 9 जिल्हय़ांमधील 60 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यात अवध क्षेत्रातील लखनौ, सीतापूर, लखीमपूर, रायबरेली, उन्नाव, हरदोईमध्ये 23 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. याचदरम्यान कल्बे जव्वादचे हे विधान मोठय़ा प्रमाणात मुस्लीम मतदारांवर प्रभाव पाडणारे ठरणार आहे. शिया धर्मगुरु असल्याने कल्बे जव्वाद यांचा या समुदायावर मोठा प्रभाव आहे. मुस्लिमांचा एक मोठा गट त्यांचा आदर करतो.