5 वर्षांच्या कारकीर्दीत मिळविली अफाट लोकप्रियता
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना स्वतःचा अभिनय आणि एक्स्प्रेशन (भावमुद्रा)मुळे चर्चेत असते. गीता गोविंदम या चित्रपटामुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील ‘येन्ती येन्ती’ गाण्यात तिचे एक्स्प्रेशन हिट राहिले. तिला ‘नॅशनल क्रश’चा टॅगही मिळाला. रश्मिका आता बॉलिवूडमध्ये कारकीर्द घडविण्यास तयार आहे.
तिच्याकडे यापूर्वीच दोन बॉलिवूड चित्रपट आहेत. तसेच तिने आता आणखी एका चित्रपटाचे संकेत दिले आहेत. बॉलिवूड आणि पेन इंडिया प्रकल्पाबद्दल बोलताना तिने दोन हिंदी चित्रपट करत असून लवकरच तिसऱयासाठी करार करणार असल्याचे सांगितले आहे.
रश्मिका सध्या गुडबाय आणि मिशन मजनू चित्रपटातून दिसून येणार आहे. मिशन मजनूमध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. तर गुडबायमध्ये अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
रश्मिकाची चित्रपटातील कारकीर्द मोठी नसली तरीही तिने जबरदस्त लोकप्रियता मिळविली आहे. रश्मिकाने 2016 मध्ये कन्नड चित्रपट किरिक पार्टीद्वारे चित्रपटजगतात पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने अंजनि पुत्र, चमक, चालो यासारखे चित्रपट केले आहेत.
2018 मध्ये प्रदर्शित विजय देवरकोंडा सोबतचा तिचा चित्रपट गीता गोविंदमला मोठी पसंती मिळाली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले होते. यानंतर ती देवदास, यजमाना, डियर कॉम्रेड, सारीलेरू नीकूव्यरू, भीष्म या चित्रपटांमध्ये दिसून आली होती.