प्रतिनिधी/ सातारा
सातारा-लोणंद मार्गावर शिदोरी ढाब्याजवळ झालेल्या दरोडय़ातील गुह्यातील दोन आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. निखिल प्रकाश वाघमळे (वय 28 रा. अंबवडे, ता. कोरेगाव) व रोहित निलेश आवाड (वय 19 रा. चंचळी, ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांनीही दरोडय़ाची कबुली दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 डिसेंबर 2020 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास सातारा-लोणंद मार्गावर पाटखळ, ता. सातारा गावच्या हद्दीत शिदोरी हॉटेलच्या समोर ज्ञानेश्वर रामदास आंबेकर (रा. घोटी, ता. इगतपुरी, जि. नाशिक) हे त्यांचा ट्रक क्रमांक (एम.एच. 15 डीके 5081) कोल्हापूर येथून नाशिककडे घेऊन जात होते. त्यावेळी अनोळखी सहाजणांनी त्यांच्या ट्रकला कार आडवी मारून वाढे फाटा येथे माझी गाडी का ठोकलीस ? असे म्हणून त्यांना व त्यांच्या सहकाऱयाला मारहाण करत ट्रकमधील पाच हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली होती. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला होता.
या दरोडय़ातील आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. दि. 29 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना आरोपींपैकी दोन आरोपी दहिवडी बसस्थानक परिसरात आले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सापळा लावून दोन संशयित आरोपींना दहिवडी बसस्टँड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे दरोडय़ाच्या गुह्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, ज्योतीराम बर्गे, पोलीस हवालदार सतीश घाडगे, संजय शेळके, विजय कांबळे, पोलीस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, साबिर मुल्ला, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाने, नितीन गोगावले, प्रमोद सावंत, गणेश कापरे, अमित सपकाळ, विक्रम पिसाळ आदींनी सहभाग घेतला.