क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
येथील दर्शन युनायटेड फुटबॉल क्लबतर्फे 15, 16 व 17 वयोगटातील फुटबॉलपटूंची निवड चाचणी टिळकवाडीतील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर घेण्यात आली.
या चाचणीत बेळगाव जिल्हय़ातील 83 फुटबॉलपटूंनी भाग घेतला होता. त्यांच्या क्षमतेची चाचणी झाल्यानंतर यातील 21 खेळाडूंची पहिल्या यादीत निवड करण्यात आली आहे. त्यांचा सराव, त्यांची तंदुरुस्ती व खेळण्याचे तंत्र पाहून यापैकी 16 खेळाडूंचा अंतिम संघ निवडण्यात येणार आहे.
या निवडलेल्या खेळाडूंना दर्शन युनायटेड क्लबशी करार करून त्यांना वेगवेगळय़ा राज्यातील फुटबॉल स्पर्धांसाठी पाठविले जाणार आहे. दर्शन युनायटेडचे चेअरमन श्रीकांत देसाई यांनी निवड चाचणीसाठी आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ज्यांची निवड झाली नाही त्यांनी पुढील निवड चाचणीपर्यंत आपल्या खेळात सुधारणा करून कौशल्य वाढविण्यासाठी आतापासूनच तयारीला लागावे. पुढील चाचणीत या खेळाडूंना प्राधान्य दिले जाईल. ज्यांची निवड झाली आहे त्यांनी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा आणि आपल्या खेळातील दोष दूर करून सक्षम खेळाडू बनावे, अशा सूचनाही दिल्या. या निवड चाचणीवेळी दर्शन युनायटेडचे स्पर्धा सचिव विजय रेडेकर, प्रमुख प्रशिक्षक किरण चव्हाण, ध्यानेश सावंत, किसन पटेल, तुषार पवार, सुनील भांदुर्गे, प्रतिक खाडे, राहुल गुरव, आर्या गिंडे, श्रेयस आपटेकर, जोतिबा पाटील, अजय कदम, अमिल बेपारी आदी खेळाडू उपस्थित होते.