क्षमतेपेक्षा जास्त भंगार भरल्याचा परिणाम
प्रतिनिधी / मडगाव
टेम्पोच्या क्षमतेपेक्षा जास्त भंगार टेम्पोत भरल्याने, या भंगाराचा रस्त्यावरील वीज वाहिन्याकडे संपर्क आला व त्यामुळे झालेल्या शार्ट सर्किटमुळे दिकरपाल-दवर्ली येथे काल शनिवारी दुपारी एका टेम्पोला आग लागण्याची घटना घडली. या आगीत सुमारे दहा हजार रूपयांची हानी झाल्याची माहिती मडगाव अग्निशामक दलाने दिली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा टेम्पो भंगार घेऊन जात असताना, त्याचा रस्त्यावरील वीज वाहिन्याकडे संपर्क आला व शार्ट सर्किट झाली. त्यात ही आग लागली. भर दुपारी ही घटना घडली. धावत्या टेम्पोला आग लागल्याने, काही वेळ रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. टेम्पो भर रस्ताच चालकाने थांबविला व आपण टेम्पोतून बाहेर पडला.
या आगीची कल्पना मडगाव अग्निशामक दलाला देताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत सुमारे 10 हजार रूपयांची हानी झाल्याची माहिती देण्यात आली. टेम्पोत क्षमतेपेक्षा जास्त भंगार भरल्याने ही आगीची दुर्घटना घडली.