ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील आमशिपोरा गावात 18 जुलैला सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान मारले गेलेले 3 जण दहशतवादी नसून, मजूर असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
मोहम्मद इबरार (वय 16), इम्तियाझ अहमद (20) आणि अब्रार अहमद (25) अशी चकमकीत मारल्या गेलेल्या मजुरांची नावे आहेत. या तिघांच्या डीएनएचे नमुने त्यांच्या कुटुंबियांच्या डीएनएशी जुळले. तपासाअंती हे तिघे दहशतवादी नसल्याचे समोर आले.
आमशिपोरा गावात शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवादी समजून या तीन मजूरांना ठार केले होते. ठार झालेल्या तीन मजुरांच्या डीएनए नमुन्यांचे अहवाल काश्मीर पोलिसांच्या हाती आले आहेत. जवानांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.