परिक्षा केंद्रावर मोबाईल कॅमेरे तहसीलदार कार्यालयास व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जोडणी
शिराळा : वार्ताहर
महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या. यावेळी पेपर फुटण्याच्या आणि इतर अनेक अनियमितता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी व शिराळा तालुक्यातील सर्व केंद्रावर १०० टक्के परिक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील केंद्रावर मोबाईल कॅमेरे लावून ते कॅमेरे तहसीलदार कार्यालयास झुम व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जोडण्यात आले होते. यावेळी तालुका दक्षता कमिटी अध्यक्ष तथा तहसीलदार विशाल नरवाडे यांच्या नियंत्रण कक्षातमधून सर्व परीक्षा केंद्रावर एकाच वेळी नजर ठेवण्यात आल्याने शिराळा दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार विशाल नरवाडे यांनी सांगितले. सदर उपक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. ते शिराळा येथील तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी नरवाडे म्हणाले, शिराळा तालुक्यात १० वी.१२ वी बोर्डाच्या परीक्षा शिस्तबद्ध व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी बहुदा जिल्ह्यांमध्येच नव्हे तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच सीसीटीव्ही कॅमेरे झूम ॲपचा वापर शिराळा तालुक्यात करण्यात आला आहे. शिराळा तालुक्यात १० वी चे २३५९ तर बारावीचे १८६० असे एकूण ४२१९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. याकरिता दहावीसाठी ५० केंद्रावर ११७ खोल्या व बारावीच्या १९ केंद्रावर ७८ खोल्या अशा एकूण ६९ केंद्रावर १९६ परीक्षा केंद्रावर झूम आप द्वारे सीसीटीव्हीच्या (मोबाईल कॅमेर्यांच्या) सहायाने परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर सहाय्यक परिरक्षक (रनर) म्हणून शिक्षक, मुख्याध्यापक पर्यवेक्षक यांना नियुक्ती करण्यात आली होती.
या सर्वाना परीक्षेपूर्वी तीन वेळा झूम ॲपचे प्रशिक्षण हि देण्यात आले होते. शिक्षकांना प्रशिक्षणामध्ये ॲप डाउनलोड करण्यापासून ते मोबाईल परीक्षा केंद्रात ठेवण्यापर्यंतचे मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी परीक्षेदिवशी प्रत्येक शिक्षकांचा मोबाईल परीक्षा केंद्रावर पूर्ण परीक्षाकक्ष कॅमेर्यामध्ये येईल असे ठेवण्यात आले होते. तसेच परिक्षा कालावधी मध्ये प्रश्नसंच वाटप करण्यापासून उत्तर पत्रिका जमा करण्यापर्यंत मोबाईल चित्रीकरण करण्यात आले. तालुका दक्षता कमिटी अध्यक्ष तथा तहसीलदार विशाल नरवाडे यांच्या नियंत्रण कक्षातमध्ये सर्व परीक्षा केंद्रावर एकाच वेळी नजर ठेवण्यात आली होती. तालुक्यातील कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरकृत्य आढळून आल्यास नियंत्रित कक्षातून संबंधिताना सूचना देण्यात येत असल्याने गैरकृत्य रोखण्यास व परिक्षा पारदर्शक होण्यास मदत झाली. तसेच या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे परीक्षा केंद्रावर पूर्ण नियंत्रण मिळण्यास मदत झाली. अशा प्रकारे शिराळा तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. या उपक्रमात तालुका दक्षता कमिटी अध्यक्ष तथा तहसीलदार विशाल नरवाडे यांच्या सोबत गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख सर्व केंद्र व उपकेंद्र संचालक, सहायक परिरक्षक, पर्यवेक्षक यांनी परिश्रम घेतले. तर विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभले.