जम्मू-काश्मीरमध्ये चार कर्मचारी निलंबित ः अनेक जणांना अटक
वृत्तसंस्था/ श्रीनगर
दहशतवाद्यांचा अर्थपुरवठा तोडण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने कठोर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून चार सरकारी कर्मचाऱयांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. या कर्मचाऱयांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा स्वयंघोषित नेता सय्यद सलाउद्दीन तसेच कारागृहात असणाऱया एका फुटीरवादी नेत्याच्या पत्नीचा समावेश आहे.
भारताविरुद्ध अपप्रचार करणे, दहशतवाद्यांना रसद पुरवणे, भारतविरोधी कारवायांना साहाय्य करणे तसेच दहशतवाद्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देण्याची सोय करणे आदी आरोप या चार कर्मचाऱयांवर ठेवण्यात आले आहेत. भारताविरोधात विखारी प्रचार करून जम्मू-काश्मीरमधील शांतता धोक्यात आणण्याची त्यांची योजना होती. यासाठी त्यांनी पाकिस्तानात असणाऱया काही दहशतवादी गटांशी संधान बांधले होते असे प्रतिपादन पोलीस अधिकाऱयांनी केले.
311 व्या अनुच्छेदाचा उपयोग
या कर्मचाऱयांना भारतीय राज्य घटनेच्या 311 व्या अनुच्छेदातील तत्त्वांच्या आधारावर काढून टाकण्यात आले आहे. या अनुच्छेदानुसार राज्य सरकार किंवा केंद्र सरकारला देशविघातक कृत्य करणाऱया कोणत्याही कर्मचाऱयाला कारणे न देता किंवा चौकशी न करता कामावरून काढून टाकण्याचा अधिकार आहे. सय्यद अब्दुल मुईद नामक कर्मचारी दहशतवाद्यांना साहाय्यभूत ठरत असल्याचे ठोसपणे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरोधातही हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.
बिबटा कराटेच्या पत्नीवर कारवाई
बिबटा कराटे नामक दहशतवाद्याच्या पत्नीने पासपोर्ट मिळविण्यासाठी खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. असाब-उल अर्जमंद खान असे तिचे नाव असून तिचे आयएसआयएस संघटनेच्या हस्तकांशी संबंध असल्याचा आरोप आहे. दहशतवाद्यांच्या साहाय्यासाठी पैशांची ने-आण करणे, भारतविरोधी कारवायांसाठी साधनसामुग्री पुरविणे, पक्षोभक साहित्य छापून वाटणे इत्यादी अनेक आरोप तिच्यावर ठेवण्यात आले आहेत.
मुहित अहमदवर कारवाई
सरकारी संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱया डॉ. मुहित अहमद भट यालाही काढून टाकण्यात आले. तो काश्मीर विद्यापीठात कॉम्युटर तज्ञ म्हणून सेवेत होता. फुटीरवादी आणि दहशतवादी कार्यक्रम काश्मीरमध्ये चालविल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दहशतवादी विचारसरणीकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मजीद हुसेन काद्री नामक साहाय्यक प्राध्यापकाला जम्मू-काश्मीर विद्यापीठात प्रक्षोभक भाषणे करण्याच्या कारणासाठी डच्चू देण्यात आला आहे. त्याचे संबंध बंदी घालण्यात आलेल्या लष्कर ए तोयबा या संघटनेशी होते, अशी माहिती मिळाली आहे.
आतापर्यंत चाळीसना डच्चू
गेल्या आठ दिवसांत प्रशासनाने कारवाईचे अभियान सुरू केले असून एकंदर 40 प्रशासकीय कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. सलाउद्दीन याचे दोन मुलगे आणि वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र सिंग यांनाही दहशतवाद्यांना साहाय्यभूत ठरल्यामुळे काम सोडावे लागले आहे.
बिहार कर्मचाऱयाच्या हत्येने तणाव
जम्मू-काश्मीरमध्ये कामासाठी आलेले बिहारमधील एका कामगाराला दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी ठार केले होते. यामुळे बिहारमधील काही भागांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. या हत्येचे पडसाद जम्मू-काश्मीरमध्येही उमटले असून अनेक हिंदू संघटनांनी हत्येचा निषेध केला आहे.