ऍड. अजय श्रीवास्तव यांनी विकत घेतला बंगला
प्रतिनिधी/ खेड
कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचे मूळगाव असलेल्या मुंबकेतील 7 मालमत्तांचा स्मगलर्स ऍण्ड फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर्स एजन्सीकडून मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लिलाव करण्यात आला. दाऊदच्या 7 मालमत्तांपैकी 6 मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दाऊदचा दुमजली बंगला ऍड. अजय श्रीवास्तव यांनी 11 लाख 30 हजाराची बोली लावून विकत घेतला. मालमत्ता विकत घेणारे दोघेही दिल्लीतील आहेत. सातवी मालमत्ता लिलावातून बाद करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर चर्चेत आलेल्या डॉ. दाऊद इब्राहिम याच्या मुंबकेतील दोन मजली बंगल्यासह 6 जमिनी, आंबा कलमांची बाग व लोटे येथील एक फ्लॉट शासनाच्या ताब्यात गेला होता. गतवर्षी या सर्व मालमत्तांचे ऍन्टी स्मगलिंग एजन्सीकडून मूल्यांकन व मूल्य निर्धारणही करण्यात आले होते. दाऊदच्या मालमत्तांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लिलाव जाहीर झाल्यानंतर साऱयांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
मालमत्ता लिलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी बोलीधारकांसह मालमत्तांची पाहणीही केली होती. मंगळवारी नरिमन पॉईंट येथील सेफेमा बिल्डींगमध्ये मालमत्तांची लिलाव प्रक्रिया पार पडली. दाऊदच्या दुमजली बंगल्यासह जमिनी व आंबा कलमाच्या बागेचा डिजिटल पद्धतीने मुंबईतूनच लिलाव झाला. या लिलाव प्रक्रियेत स्थानिकही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र एकही स्थानिक ग्रामस्थ यात सहभागी झाला नसल्याचे समजते.
ऍड. अजय श्रीवास्तव यांनी दुमजली बंगल्यासाठी 11 लाख 30 हजाराची बोली लावत दाऊदच्या आईच्या नावावर असलेला सर्व्हे नं. 181 (घर क्र. 172) 27 गुंठे जागेतील दुमजली बंगला विकत घेतला. यात सर्व्हे नं. 153 (24 गुंठे) मालमत्तेचाही समावेश आहे. भूपेंद्र भारद्वाज यांनी सर्व्हे नं. 151 (27 गुंठे), सर्व्हे नं. 152 (29 गुंठे), सर्व्हे नं. 150 (20 गुंठे), सर्व्हे नं. 155 (18 गुंठे) आदी मालमत्तांवर बोली लावत विकत घेतल्या. दाऊदची सातवी मालमत्ता लिलावातून बाद झाली असून इकबाल मिर्चीच्या मालमत्तेवर बोली लागली नसल्याचे समजते.