प्रतिनिधी / दापोली :
झाडे वाहतुकीसाठी पासाची मागणी करण्यासाठी आलेल्या तक्रारदाराकडून 6 हजार 500 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दापोलीतील वनपाल गणेश खेडेकर व सचिन आंबेडे हे गुरूवारी लाचलुचपतच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले. या कारवाईमुळे जिल्हय़ातील वनविभागात खळबळ उडाली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदारांचा लाकूड विक्रीचा व्यवसाय आहे. यासाठी त्यांनी दापोली येथील शेतकऱयाकडून तोडणी केलेले जळाऊ व इमारती लाकूड विकत घेतले. ही झाडे तोडण्यासाठी वनविभागाची परवानगी घेण्यात आली असून तोडलेल्या झाडांच्या लाकडांची वाहतुकीच्या पासची मागणी
करण्यासाठी तक्रारदारांनी दापोली परिमंडळ वनाधिकाऱयांच्या कार्यालयात जाऊन वनपाल खेडेकर व आंबेडे यांची 20 ऑगस्ट रोजी भेट घेतली. त्यावेळी या दोघांनी तक्रारदाराकडे प्रत्येक वाहतुकीच्या पाससाठी 1300 रूपये याप्रमाणे 5 पासांचे 6,500 रूपयांची लाच मागितली. परंतु लाकूड वाहतुकीच्या पासचे शासकीय शुल्क 100 रूपये असताना वरील आरोपींनी तक्रारदाराकडे इतके पैसे मागितल्याने त्यांनी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
त्यानुसार गुरूवारी सापळा रचण्यात आला. मात्र शंका येऊ नये म्हणून प्रत्येक पासच्या 1300 रूपयांऐवजी 1000 रूपयांची तडजोड करून 5 पासचे 5,000 रूपये वनपाल खेडेकर यांच्या कार्यालयात काम करणाऱया आंबेडे याच्यामार्फत स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार हे पैसे स्वीकारताना सायंकाळी 4 वाजता पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी खेडेकर व आंबेडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलीस नाईक विशाल नलावडे, पोलीस नाईक योगेश हुंबरे आदींच्या पथकाने केली.