अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दापालीत बरसला वरूणराजा
प्रतिनिधी/ दापोली
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दापोलीत मंगळवारी दुपारी वरुणराजाने बरसायला प्रारंभ केला. यामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्या दापोलीकरांना दिलासा मिळाला आहे.
समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून कोकणात मान्सूनपूर्व सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. यानुसार मंगळवारी दुपारपासून दापोलीत पाऊस पडायला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांच्या सामानाचे नुकसान झाले. अनेकांनी जोरदार पाऊस आल्यामुळे लगतच्या दुकानात अथवा झाडाखाली आसरा घेतला. या पावसामुळे दापोली शहरात सुखद गारवा निर्माण झाला आहे.