प्रतिनिधी/ दापोली
रायगड जिह्यातील महाड येथून दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या 8 युवकांपैकी दोघेजण पाळंदे समुद्रात बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास घडली. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून दोघांचे मृतदेह सापडले. यावेळी उर्वरित 6 युवकांना वाचवण्यात येथील स्थानिक ग्रामस्थांना यश आले. ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने दीपावलीच्या आनंदाला गालबोट लागले आहे.
यामध्ये दीपक सुतार व प्रसंजीत तांबे (दोघेही, रायगड-महाड (नवानगर) यांचे मृतदेह सापडले आहेत. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिह्यातील महाड-नवानगर येथील सुतार आळीतील दीपक सुतार (19), प्रसंजीत तांबे (16), राजेश पवार (21), यश पवार (17), राहूल पवार (16), निखिल कोळंबेकर (18), सोहम सकपाळ (16) व शिवम सोंडकर (16) हे आठ मित्र मॅक्झिमो गाडीने दापोलीत फिरण्यासाठी आले होते. शनिवारी सकाळी ते पाळंदे समुद्रकिनारी आले. तेथे आल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी नाष्टा केला व समुद्रात पोहायला जायचा निर्णय घेतला. त्यांनी आपली मॅक्झिमो गाडी वाळूत नेल्यावर त्यांची गाडी वाळूत फसली. ही गाडी सर्वांनी मिळून बाहेर काढली.
यानंतर सर्वजण समुद्रात पोहायला गेले. शनिवारी अमावस्या असल्याने अमावस्येची ओहोटी होती. यावेळी पाण्याचा व ओहोटीचा अंदाज न आल्याने सर्वजण पाण्यात बुडायला लागले. शिवाय याच ठिकाणी पाण्याचे ऊंच-सखलपणा असल्याची माहिती ग्रामस्थ अभिजित भोंगले यांनी पत्रकारांना दिली. यावेळी राकेश पवार हा चालक गाडीत बसला होता. उर्वरित 7 जणांपैकी सोहम सकपाळ व शिवम सोंडकर यांनी सर्वजण बुडत आहेत, हे लक्षात आल्यावर वाळूच्या दिशेने पळ काढला व ते वाचले.
सर्व मित्र आपल्या घरी रवाना होणार होते पण…
हे सर्व युवक मित्र होते. हे शनिवारी सकाळी दापोलीत फिरण्यासाठी आले होते. येथे मौजमजा करून सायंकाळी पुन्हा आपल्या घरी रवाना होणार होते. मात्र दोघेजण बुडाल्याने या सर्वांवर शोककळा पसरली आहे. अभिजित भोंगले, सलीम बोरकर, नितेश मोरे, प्रवीण तवसाळकर, प्रितम तवसाळकर आणि अनिकेत बोरकर आदी ग्रामस्थांनी या युवकांना वाचवण्यास मदत केली.
निखिल, अक्षय तत्काळ धावल्याने वाचला युवकांचा जीव
हे सर्वजण समुद्रात बुडत असता सोहम सकपाळ, शिवम सोंडकर व चालक राकेश पवार यांनी मोठय़ाने आरडाओरडा केला. यामुळे समुद्र किनाऱयालगत असणारे निखिल बोरकर व अक्षय टेमकर यांनी तत्काळ समुद्रकिनारी धाव घेतली. तसेच आपल्याकडील दोऱया समुद्रातील पाण्यात फेकल्या. यामुळे यश पवार, राहुल पवार व निखिल कोळंबेकर यांना वाचवण्यात यश मिळाले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.