प्रतिनिधी/ वास्को
दाबोळी विमानतळासमोरील ग्रेड सॅपरेटर या उड्डाण पुलावर शनिवारी संध्याकाळी पहिला अपघात घडला. बांधकामासाठी वापरण्यात येणाऱया विटांसह एक ट्रक या पुलाच्या वळणावर कोसळला. या अपघातामुळे पुलाच्या कठडय़ाचीही हानी झाली. मात्र, चालक सुखरूप बचावला.
दाबोळी विमानतळासमोरील महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात आलेला ग्रेड सॅपरेटर हा उड्डाण पुल हल्लीच वाहतुकीस खुला करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतुकीची चांगली सोय झालेली आहे. मात्र, काही वाहन चालक या उड्डाण पुलाचा आनंद घेण्यासाठी अनियंत्रीतपणे वाहन हाकत असल्याचे नजरेस आले आहे. या वळणदार पुलावर सुखद अनुभव घेताना बेपर्वाईही होत असून याचाच प्रत्यय शनिवारी संध्याकाळी आला. वेर्णाहून वास्कोच्या दिशेने बांधकामाच्या विटां घेऊन येणारा एक ट्रक या पुलावरील वळणावर कोसळला. त्यामुळे पुलाच्या कठडय़ाची हानी झाली तसेच काही विटा पुलाखालील महामार्गावरही कोसळल्या. यावेळी पुलाखालील महामार्गावर एखाद वाहन चालक आला असता तर गंभीर अपघात घडला असता. सुदैवाने या अपघात चालक वा कुणी जखमी झाला नाही. वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण गेल्यानेच हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. वास्को पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या अपघाताची पाहणी केली. शांतीनगरच्या दिशेने असलेल्या पुलावर हा अपघात झाला.