प्रतिनिधी/ वास्को
दाबोळी विमानतळावर सुमारे 33 लाख रुपये किमतीचे तस्करीचे सोने कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी हवाई प्रवाशाकडून जप्त केले. हे सोने 821 ग्रॅम वजनाचे असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत सुमारे 33 लाख रुपये आहे. हे सेने हवाई प्रवाशाने आपल्या अंतवस्त्रात लपवून विदेशातून भारतात आणले होते. कस्टम खात्याच्या पथकाने शनिवारी पहाटे ही कारवाई केली. कस्टमने हवाई प्रवाशाला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
कस्टम खात्याच्या या पथकाला दाबोळी विमानतळावर अवैध मार्गाने सोने येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे या पथकाच्या अधिकाऱयांनी दाबोळी विमानतळावर उतरणाऱया हवाई प्रवाशांवर पाळत ठेवली होती. एक हवाई प्रवासी परदेशागमन विभागाच्या अधिकाऱयांकडे तपासणीसाठी गेला असता त्याच्या हालचालीबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी त्या प्रवाशाला ताब्यात घेतले. हा प्रवासी 6ई-8445 इंडिगो फ्लाईटच्या विमानाने शनिवारी पहाटे दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरला होता.
अंतवस्त्रात लपवले होते सोने
संशयित हवाई प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता, त्याच्याकडे काही सापडले नाही. मात्र, त्याची झडती घेतली असता त्याच्या अंतवस्त्र्रात 610 ग्रॅम सोने सापडले. हे सोने द्रव्य स्वरूपात होते. शिवाय त्याच्याकडे प्रत्येकी 98 ग्रॅम व 113 ग्रॅमच्या दोन सोनसाखळय़ाही सापडल्या. अंतवस्त्रात सोने लपवल्यास कुणालाही संशय येणार नाही, असा त्याचा समज होता. मात्र, हा अंदाज फोल ठरल्याने तो कस्टमच्या जाळय़ात अडकला. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 33,06,097 रुपये एवढी आहे.
गोवा कस्टम विभागाचे आयुक्त मिहीर रंजन यांच्या सर्वकष मार्गदर्शनाखाली कस्टमचे सहआयुक्त श्रीमती ज्युलेट फर्नांडिस व कस्टमच्या दाबोळीतील तज्ञ पथकाने ही कारवाई केली. सदर हवाई प्रवाशाला अटक करण्यात आलेली असून कस्टमकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.
दाबोळी विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱयांनी एप्रिल 2020पासून आतापर्यंत सतत केलेल्या कारवाईत 3336 ग्रॅम सोने जप्त केलेले असून जप्त केलेल्या सोन्याची किमत 1 कोटी 44 लाख रूपये आहे.