सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत होणार विक्री
प्रतिनिधी बेळगाव
राज्य सरकारने शनिवारी जारी केलेल्या आदेशानुसार सोमवारी 4 मे पासून वाईन शॉप व एमएसआयएलची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी रविवारी वाईन शॉपसमोर बॅरिकेड्सही उभी करण्यात आली आहेत.
सामाजिक अंतर व मास्कसह इतर काळजी घेऊन सीएल-2 आणि सीएल-11सी दुकाने उघडण्यासाठी अबकारी आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत वेळ ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे तळीरामांची प्रतीक्षा संपणार आहे.
त्यासाठी सात अटी घालण्यात आल्या आहेत. वाईन शॉप व एमएसआयएलमध्ये काम करणारे कर्मचारी व खरेदीसाठी करण्यासाठी येणाऱयांनी मास्क परिधान करणे सक्तीचे आहे. किमान सहा फुटाचे अंतर ठेवावे, सॅनिटायझरचा वापर करावा अशा सात अटी घालून दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.
अबकारी अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव शहरात एमएसआयएलच्या सात दुकानांसह 50 ते 70 दुकाने सोमवारी सुरू होणार आहेत. दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर बांबूचे बॅरिकेड्स उभे करून शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.