‘साँगफेस्ट इंडिया’ एक नवाकोरा म्युझिक व्हिडीओ घेऊन येत आहे. ‘वन वे तिकीट’ या चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक गौरव डगावकर याने ‘काहे कोई आंसू’ हे नवे गाणे संगीतबद्ध केले असून याचे गीतकार अंगशुप्रिया साहा आहेत. या गाण्यात अभिनेत्र दिप्ती देवी झळकणार आहे.
‘काहे कोई आंसू’ या साँगफेस्ट इंडियाच्या नवीन हिंदी गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये मराठी अभिनेत्री दिप्ती देवी अभिनय करत असून या अभिनेत्रीने या गाण्याद्वारे म्युझिक व्हिडीओच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. कोलकात्यामधील सुप्रसिद्ध गायिका लग्नजिता चक्रवर्तीच्या मधुर आवाजात हे गाणे ऐकण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळणार आहे. ‘कंडिशन्स अप्लाय’ आणि ‘नाळ’ या चित्रपटांमधून मोठय़ा पडद्यावर आणि ‘मला सासू हवी’ आणि ‘अंतरपाट’ या मालिकांमधून छोटय़ा पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी दिप्ती ‘काहे कोई आंसू’मधून म्युझिक व्हिडीओमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहे. या पहिल्यावहिल्या म्युझिक व्हिडीओबद्दल बोलताना अभिनेत्री दिप्ती देवी म्हणाली की, म्युझिक व्हिडीओमधील पदार्पणाविषयी मी फारच उत्सुक आहे. दर्जेदार शब्दरचना आणि अप्रतिम संगीत यामुळे हे गाणे खास जमून आले आहे.
लग्नजिताच्या उत्तम आवाजाने या गाण्याला चार चाँद लावले आहेत. संगीतकार आणि साँगफेस्ट इंडियाचा संस्थापक गायक आणि संगीत दिग्दर्शक गौरव डगावकर यानेही या गाण्याविषयी आपला अनुभव शेअर केला. लग्नजिता आणि दिप्ती देवी या दोघी माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. ‘काहे कोई आंसू’च्या निमित्ताने दोघींसोबत एकत्र काम करायची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला. नुकतेच साँगफेस्ट इंडियाच्या युटय़ुब चॅनेलवर ‘काहे कोई आंसू’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.