ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत कोरोना बाधितांचा आकडा 90 हजारच्या जवळपास पोहोचली आहे. बुधवारी दिवसभरात 2442 नवे कोरोना रुग्ण आढळून आले.
त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 89 हजार 802 वर पोहचली आहे. यामधील 27 हजार 007 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 59 हजार 992 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. आतापर्यंत 2803 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत 5,51,708 टेस्ट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरोग्य मंत्रालयाने दिल्लीतील कोविड रुग्णालयाच्या देखरेखीसाठी तीन विशेष टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांसोबत आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही सहभागी करण्यात आले आहे.