ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच दिल्लीतून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. दिल्लीत चक्क 106 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. या आजोबांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली. या आजोबांनी 70 वर्षाच्या मुलाच्या आधी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. विशेष म्हणजे हे आजोबा 1918 साली आलेल्या स्पॅनिश फ्लूच्या महासाथीच्या वेळी ते केवळ 4 वर्षांचे होते.
डॉक्टरांनी सांगितलं की, कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्या 106 वर्षांच्या या रुग्णाला राजीव गांधी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे झाल्यानंतर या आजोबांच्या पत्नी, मुलगा आणि कुटुंबातील इतरांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.
एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, या 106 वर्षीय रुग्णाने या अगोदर 1918 साली आलेला स्पॅनिश फ्लू देखील पाहिला होता. त्यावेळी स्पॅनिश फ्लूने जगभरात हाहाकार माजवला होता. एका अंदाजानुसार ‘स्पॅनिश फ्लू’मुळे चार ते पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच त्यावेळी असणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या 1.7 टक्के लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला होता.