बेळगाव / प्रतिनिधी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून रसातळाला गेलेला कापड व्यवसाय दिवाळीच्या निमित्ताने उभारी घेत आहे.
दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक जण काही ना काही खरेदी करत असतो. पण त्या आधी सर्वजण कपडे खरेदी करतात. त्यात रेडिमेड कपडय़ांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. लहान मुलांचे डेस, फ्रॉक, डिझायनर डेस, कुर्ता, वेगवेगळय़ा प्रकारच्या साडय़ा यालाही मोठय़ा प्रमाणात मागणी वाढली आहे.
मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे लग्न समारंभाची खरेदीही नागरिकांना करता आली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांनी विवाह सोहळय़ाचे मुहूर्त पुढे ढकलले, जेणेकरून आपल्या अपत्याचे लग्न थाटामाटात करण्याची हौस पूर्ण होईल. यंदा डिसेंबर महिन्यात लग्नसराईचे मुहूर्त अनेक असल्यामुळे बाजारपेठेत लग्नसराईच्या खरेदीसाठी, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
गणेशोत्सव काळात अनेकांनी कोरोनाला घाबरून दुकानात न जाता ऑनलाईन शॉपिंग करण्यावर भर दिला होता. मात्र ऑनलाईन शॉपिंगमध्ये दाखविलेल्या वस्तू या प्रत्यक्षात वेगळय़ाच असल्यामुळे सर्वांनी प्रत्यक्षात बाजारात जाऊन कपडे खरेदी करण्याकडे भर दिल्याचे दिसून येत आहे.
सर्व दुकानदारांनी ग्राहकांची गर्दी दुकानात होणार हे लक्षात घेऊन दुकानाच्या प्रवेशद्वारावरच प्रत्येक ग्राहकाची थर्मल स्क्रिनिंग करून हातावर सॅनिटायझर देऊन प्रवेश दिला जात आहे. ग्राहकाने मास्क परिधान करूनच यावे लागत आहे.
काही दुकानदारांनी ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होऊ नये व दुकानात सोशल डिस्टन्स पाळले जावे याकरिता दुकानाच्या बाहेर बसण्याचीही व्यवस्था केली आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येकाला खरेदी करण्यास दुकानात प्रवेश दिला जात आहे.
दिवाळीला लहान मुलांना कपडे घेण्याकडे कल वाढला आहे. साडय़ांमध्येही नवीन व्हरायटी आल्यामुळे महिलावर्गही मोठय़ा प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करू लागल्याचे दिसून येत आहे. एकंदर ही दिवाळी पाहता गेल्या सात-आठ महिन्यांपासून आलेल्या संकटाला माघारी धाडून पुन्हा नव्या जोमाने सर्वांना व्यवसाय करण्यासाठी प्रेरणा देत आहे.
प्रतिक्रिया
1. : पाच हजार रुपयांच्याखरेदी वर गिफ्ट : राजू खोडा
गणेशोत्सव काळापेक्षा दिवाळीच्या काळात नागरिकांचा खरेदीचा ओढा दुकानात मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. ग्राहकांनी पाच हजार रुपयांच्या वर खरेदी केल्यास त्यांना गिफ्टही ठेवण्यात आले आहे. मंगल वेडिंग मॉलमध्ये लहान मुलांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वांसाठी कपडे उपलब्ध आहेत, तर मंगलदीप प्लस साईज या नावाने महिलांसाठी वेगळे दुकान असून तेथेही मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे.
2. नागरिकांना परवडणाऱया दरातच विक्री : संजय काकडे
कोरोनाची एकंदर परिस्थिती पाहता दुकानात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होईल असे वाटले नव्हते. पण नागरिक सर्व ती खबरदारी घेऊन खरेदी करत आहेत. यावषी आम्ही नागरिकांना परवडतील अशा दरातच कपडे विक्री करण्यासाठी ठेवले आहेत.