सांगली पोलीस अधीक्षकपदी बदली
प्रतिनिधी / ओरोस:
सिंधुदुर्ग पोलीस दलाची शान राहिलेल्या पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या बदलीनंतर ते सांगली येथे रवाना होताना त्यांना पोलीस दलातर्फे मिरवणूक काढून अनोखी मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार त्यांनी 27 एप्रिल 2017 रोजी स्वीकारला होता. अमोघ गावकर यांच्या अवघ्या दहा महिन्यांच्या सेवाकालानंतर त्यांच्या जागी आलेल्या गेडाम यांच्या भूमिकेकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र चांगल्या कामगिरीच्या जोरावर साडेतीन वर्षे एवढा सर्वाधिक काळ या पदावर राहणारे ते जिल्हय़ातील पहिले अधीक्षक ठरले. शांत, संयमी आणि समोरच्या व्यक्तीचा आदर करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांनी जिल्हावासीयांबरोबरच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱयांच्या मनातही आदराचे स्थान निर्माण केले होते.
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका अतिशय शांत आणि मोकळय़ा वातावरणात पार पाडण्यात ते यशस्वी ठरले होते. चोऱयांना लगाम घालण्यासाठी जिल्हय़ात सी. सी. टीव्हीचे जाळे निर्माण करण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली. पोलिसांच्या गृहनिर्माणाचा प्रश्नही त्यांनी मार्गी लावला. कोणत्याही वादात न अडकता राजकीय व्यक्ती, प्रशासन व नागरिक यांच्यात सलोखा निर्माण करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यातही ते यशस्वी ठरले.
साडेतीन वर्षे जिल्हय़ाच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळणाऱया गेडाम यांची शासनाने सांगली जिल्हय़ाच्या अधीक्षक पदी नियुक्ती केली आहे. तर त्यांच्या जागी मुंबई गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान बदली झाल्याने सांगली येथे जाणाऱया गेडाम यांची पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनी सजवलेल्या गाडीतून सपत्नीक मिरवणूक काढून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते निवासापर्यंत अनोखी मानवंदना दिली.