बेळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बँका दुपारी 2 वाजेपर्यंतच खुल्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहर तसेच उपनगरांमधील बँका दुपारी 2 नंतर ग्राहकांसाठी बंद केल्या जात आहेत. तसेच एकाचवेळी गर्दी होऊ नये, यासाठी मोजक्मयाच ग्राहकांना बँकेत थर्मल स्क्रिनिंग करून प्रवेश दिला जात असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. आर्थिक व्यवहारांसाठी दररोज शेकडो ग्राहक बँकांमध्ये जात असतात. वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने दुपारपर्यंत बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱयांचीही संख्या कमी करण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश दिला जात आहे.
पासबुक अपडेट बंद
पासबुक अपडेट करण्यासाठी ग्राहकांची बँकांमध्ये गर्दी होते. हे टाळण्यासाठी बँकांनी पासबुक अपडेट बंद केले आहे. यामुळे जे ग्राहक अपडेट करण्यासाठी येतात त्यांना माघारी पाठविले जात आहे. मात्र एटीएम, नेट बँकिंग व मोबाईल बँकिंग सुरू असल्याने ग्राहकांची सोय होत आहे.