मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / म्हापसा
भाजप सरकार राज्यात आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ हा मंत्र घेऊन काम करीत आहे. भौतिक विकासासोबत नागरिकांचा आर्थिक स्तर सुधारला पाहिजे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून राज्यातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
पर्रा पंचायत घराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो, पर्रा सरपंच डिलायला लोबो व इतर पंचसदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना नावेली सासष्टी आज जनतेचा श्वास कोंडून ठेवणारे कचऱयाचे डोंगर भाजपने नव्हे तर या आधीच्या काँग्रेस सरकारने केले आहेत. राज्यातील कचरा समस्येसोबतच बेकारी आणि इतर समस्या सोडविण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करेल असे आश्वासन देताना 2012 साली माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अडीच कोटींच्या कोळसा खणी गोव्यात सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे राज्यात कोळसा भाजपकडून नव्हे काँग्रेस सरकारच्या काळात आणला गेला असून त्याचे खापर भाजपवर फोडू नका असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.
यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, गोवा प्रगतीच्या दिशेने झपाटय़ाने पावले टाकीत आहे. या आधीची सरकारे केवळ पायाभरणी करायचे आणि वर्षानुवर्षे फक्त त्याजागी दगडच दिसायचे. भाजप काळात हातात घेतलेली कामे पूर्ण करून दाखवित असल्याने विरोधकांचा पोटशूळ उठलेला आहे. राज्यातील वीज समस्या तसेच बेकारीची समस्या पूर्णपणे निपटून काढण्यासाठी नवनवीन प्रकल्प राज्यात आणणे काळाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी कोविड महामारीच्या काळात सुद्धा कामात अडथळा निर्माण होऊ दिला नाही तसेच विकासकामात खंड पडू दिला नाही. आतापर्यंत बत्तीस कोटीपेक्षा अधिक फंड पंचायतींना मिळालेला नव्हता परंतु आपण सर्वप्रथम 75 कोटींचा निधी आणल्याचे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. स्थानिक तरुणांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी 15 वर्षे गोव्यात वास्तव्य करून राहणाऱययांसाठी पर्यटक टॅक्सी व्यवसाय करण्याचा परवाना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आपण घेतल्याचे शेवची मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले की, गोवा साधन सुविधा मंडळाने पर्रातील नवीन पंचायतीचे काम रिकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण करून दाखविल्याबद्दल पर्राच्या सरपंच डिलायला लोबो, कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो म्हणाले की, आपल्या कारकिर्दीत कळंगुटचा जो विकास झाला तो येथील लोकांनी सहकार्य केल्याने. यापुढेही लोकांना हवा तसाच पर्रा पंचायत क्षेत्रातील विकास होईल असे मायकल लोबो यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते समई प्रज्वलित करून तसेच फित कापून नवीन पंचायत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी सरपंच डिलायला लोबो यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रदीप मोरजकर यांनी केले. सदर कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून पार पडला.