वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेची स्थिती मजबूत झाली आहे. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 364 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंडची पहिल्या डावात स्थिती 5 बाद 175 अशी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जान्सन आणि रबाडा यांची कामगिरी दर्जेदार झाली.
दक्षिण आफ्रिकेने 3 बाद 238 या धावसंख्येवरून शनिवारी दुसऱया दिवसांच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 7 गडी 126 धावांची भर घालत तंबूत परतले. दक्षिण आफ्रिकेच्या डावात सलामीच्या इर्वेने 221 चेंडूत 14 चौकारांसह 108, मॅरक्रमने 8 चौकारांसह 42, व्हान डेर डय़ुसेनने 1 चौकारांसह 35, बवूमाने 5 चौकारांसह 29, जान्सनने 6 चौकारांसह नाबाद 37 तर केशव महाराजने 6 चौकारांसह 36 धावा जमविल्या. न्यूझीलंडतर्फे मॅट हेन्रीने 90 धावांत 3, वॅग्नरने 102 धावांत 4, जेमिसनने 74 धावांत 2 आणि साऊदीने 75 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडला दिवसअखेर पहिल्या डावात 45 षटकांत 5 बाद 157 धावांवर समाधान मानावे लागले. कॉलिन ग्रँडहोम 2 षटकार आणि 7 चौकारांसह 54 तर मिचेल 4 चौकारांसह 29 धावावर खेळत आहे.
न्यूझीलंडच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. डावातील पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर कर्णधार लॅथम रबाडाच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. त्यानंतर रबाडाने यंगला 3 धावांवर बाद केले.
जान्सनने कॉनवेला 16 धावांवर तर निकोल्सला 39 धावांवर बाद केले. निकोल्सने आपल्या खेळीत 8 चौकार ठोकले. रबाडाने ब्लंडेलचा 6 धावांवर त्रिफळा उडविला. न्यूझीलंडची स्थिती यावेळी 5 बाद 91 अशी केविलवाणी झाली होती. ग्रॅण्डहोम आणि डॅरेल मिशेल या जोडीने सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 61 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेतर्फे रबाडाने 37 धावांत 3 तर जान्सनने 48 धावांत 2 गडी बाद केले. न्यूझीलंडचा संघ अद्याप 207 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 5 गडी बाकी आहेत.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प. डाव 133 षटकांत सर्वबाद 364 (इर्वे 108, एल्गार 41, मॅरक्रम 42, व्हान डेर डय़ुसेन 35, बवूमा 29, मल्डर 14, जान्सन नाबाद 37, केशव महाराज 36, वॅग्नर 4-102, हेन्री 3-90, जान्सन 2-74, साऊदी 1-75), न्यूझीलंड प. डाव 45 षटकांत 5 बाद 157 (ग्रॅण्डहोम खेळत आहे 54, डॅरेल मिशेल खेळत आहे 29, कॉनवे 16, निकोल्स 39, ब्लंडेल 6, रबाडा 3-37, जान्सन 2-48).