इंग्लंडला पहिल्या डावात 354 धावांची आघाडी, शमीचे 4, बुमराह, सिराज, जडेजाचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था/ लीड्स
तिसऱया कसोटीच्या तिसऱया दिवशी चहापानापर्यंत भारताने दुसऱया डावात सुधारित कामगिरी करीत 1 बाद 112 धावांपर्यंत मजल मारली होती. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव 132.2 षटकांत 432 धावांत आटोपल्यानंतर त्यांना 354 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
इंग्लंडने 8 बाद 423 या धावसंख्येवरून तिसऱया दिवसाच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि उर्वरित दोन गडय़ांनी केवळ 9 धावांची भर घातली. भारताचा पहिल्या डावात इंग्लंडच्या भेदक माऱयासमोर केवळ 78 धावांत फडशा पडला होता. पण दुसऱया डावात भारतीय आघाडीवीरांनी सुधारित प्रदर्शन केले. उपाहारापर्यंत रोहित शर्मा व केएल राहुल यांनी अँडरसनचा प्रारंभीचा तिखट मारा व्यवस्थित खेळून काढत एकही बळी जाऊ दिला नव्हता. ही जोडी उपाहारापर्यंतचा वेळ खेळून काढेल असे वाटत असतानाच ओव्हर्टनच्या गोलंदाजीवर बेअरस्टोने पहिल्या स्लिपपर्यंत झेपावत अप्रतिम झेल टिपून राहुलचा बळी मिळविला. राहुलने 54 चेंडू प्रतिकार करीत 8 धावा जमविल्या. उपाहारानंतरच्या सत्रात रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा जोडी जमली आणि चहापानापर्यंत त्यांनी आणखी पडझड होऊ न देता संघाला शतकीपार मजल मारून दिली होती.
पुजारा नेहमीप्रमाणे सावध खेळ करीत होता, तर रोहित बचाव व आक्रमण दोन्हींचा मिलाफ साधत फलंदाजी करीत होता. चहापानास खेळ थांबला तेव्हा रोहित 59 व पुजारा 40 धावांवर खेळत होते. रोहितने यावेळपर्यंत 152 तर पुजाराने 72 चेंडू खेळले होते. रोहितने आपल्या खेळीत 7 चौकार, 1 षटकार मारला होता तर पुजाराने 7 चौकार मारले होते.
तत्पूर्वी, सकाळी इंग्लंडच्या क्रेग ओव्हर्टन व ऑली रॉबिन्सन यांनी 8 धावांची भर घातली. शमीने ओव्हर्टनला पायचीत केल्यानंतर बुमराहने पुढच्या षटकात रॉबिन्सनचा शून्यावर त्रिफळा उडवित इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांत संपुष्टात आणला. इंग्लंडच्या डावात रूटने 121 धावा जमवित 23 वे शतक नोंदवले तर बर्न्स (61), हमीद (68), डेव्हिड मलान (70) यांनी अर्धशतके झळकवली. याशिवाय बेअरस्टोने 29, ओव्हर्टनने 32, सॅम करणने 15 धावा केल्या तर अवांतराच्या रूपात त्यांना 21 धावा मिळाल्या. मोहम्मद शमी भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 95 धावांत 4 बळी टिपले तर बुमराह, मोहम्मद सिराज, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. महागडा ठरलेल्या इशांतने 92 धावा दिल्या. पण त्याला एकही बळी मिळविता आला नाही.
संक्षिप्त धावफलक ः भारत प.डाव 78, इंग्लंड प.डाव 132.2 षटकांत सर्व बाद 432 ः बर्न्स 61, हसीब हमीद 68, मलान 70, रूट 121, बेअरस्टो 29, बटलर 7, मोईन अली 8, सॅम करण 15, ओव्हर्टन 32, रॉबिन्सन 0, अँडरसन नाबाद 0, अवांतर 21. गोलंदाजी ः मोहम्मद शमी 4-95, बुमराह 2-59, मोहम्मद सिराज 2-86, रविंद जडेजा 2-88, इशांत शर्मा 0-92.
भारत दु.डाव (चहापानापर्यंत) ः रोहित शर्मा खेळत आहे 59 (152 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), केएल राहुल 8 (54 चेंडू), पुजारा खेळत आहे 40 (72 चेंडूत 7 चौकार), अवांत 5, एकूण 46 षटकांत 1 बाद 112. गोलंदाजी ः ओव्हर्टन 1-18, अँडरसन 0-26, रॉबिन्सन 0-31, करण 0-29, मोईन अली 0-7.