गोव्यातील दोघांचा समावेश : आयएमएची माहिती
प्रतिनिधी / पणजी
कोरोना महामारीच्या दुष्टचक्रात भरडल्या गेलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना स्वतःही संसर्गीत झाल्यामुळे देशात आतापर्यंत सुमारे 513 डॉक्टर्सनी प्राण गमावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये दोघा गोमंतकीय डॉक्टरांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) ही आकडेवारी उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी कोरोनाच्या दुसऱया लाटेत बळी गेलेल्या डॉक्टरांची आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वर्ष 2020 मध्ये देशभरात एकूण 748 डॉक्टर्स दगावले होते.
दिल्लीत सर्वाधिक 103 डॉक्टरांचे बळी
आयएमएने प्रत्येक राज्यातील कोरोना बळी ठरलेल्या डॉक्टरांच्या संख्येच्या नव्याने जारी केलेल्या यादीत ही माहिती देण्यात आली आहे. त्यात देशात दिल्लीत सर्वाधिक 103 डॉक्टर्स बळी गेल्याचे म्हटले आहे. त्यापाठोपाठ बिहारमध्ये 96 तर उत्तरप्रदेशमध्ये 41 डॉक्टर्स दगावले आहेत. त्याशिवाय राजस्थानमध्ये 39 तर आंध्र प्रदेश, झारखंड आणि तेलंगणमध्ये प्रत्येकी 29 जणांचे बळी गेले आहेत.
आयएमएच्या प्रत्येक राज्यात शाखा असून त्यांची सदस्यसंख्या सुमारे 3.5 लाख आहे. या शाखांकडून प्राप्त माहितीच्या आधारेच मृत डॉक्टरांची संख्या जाहीर करण्यात येते. प्रत्यक्षात देशभरात अंदाजे 12 लाख डॉक्टर्स आहेत. त्यामुळे आतापर्यंत मृत झालेल्या डॉक्टरांची संख्या हजारोंच्या संख्येनेही असू शकते, असा अंदाजही आयएमएने व्यक्त केला आहे.
दरम्यान, गोव्यातील दोन्ही डॉक्टर्स हे कोरोनाच्या दुसऱया लाटेचे बळी ठरले असून गत दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.