-राज्यातला पहिलाच प्रकल्प, -निसर्गयात्री संस्थेचा पुढाकार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यात विविध ठिकाणी कातळ खोदचित्रे आढळली असून त्यांचे जतन, विकास यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तालुक्यातील देऊड येथे कातळ खोदचित्र संरक्षण संवर्धनासाठी राज्यातील पहिलाच प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद व्हावी, अशा बहुमोल ठेव्याचे संरक्षण, संवर्धन यासाठी निसर्गयात्री संस्थेने याकामी पुढाकार घेतला आहे. देऊड येथे खोदचित्र संवर्धनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. चित्रांना कोणत्याही प्रकारचा धोका न पोहोचता खुले, पारंपरिक बांधणीयुक्त संग्रहालय व माहिती, स्थानिक कलाकार, महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे दालन याचाही समावेश या प्रकल्पात करण्यात आला आहे.
हजारो वर्षे विस्मृतीच्या पडद्याआड असलेला कोकणातील खोदचित्रांचा अविष्कार शोधून जगासमोर आणण्याचे काम सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकूददेसाई यांनी स्वखर्चाने व अविश्रांत मेहनतीने केले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात 65 गावांतून 1500 पेक्षा अधिक खोद चित्ररचना त्यांनी शोधून काढल्या आहेत. या स्थळांचे अधिकाधिक सखोल संशोधन व्हावे, या स्थळांचे जतन व संवर्धन व्हावे तसेच पर्यटन केंद्रे म्हणून त्यांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
जगात अद्वितीय अशा या वारसास्थळांना आधुनिक विकासाचा मोठय़ा प्रमाणात धोका आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण, संवर्धन करण्याकरीता निसर्गयात्री संस्थेने नियोजनबद्ध विकासासाठी प्राथमिक आराखडा तयार केला. प्रथम उक्षी गावातील हत्तीचे खोदचित्र लोकसहभागातून संरक्षित केले. दुसऱया टप्प्यात देऊड सडय़ावरील खोदचित्र ठिकाणाचे संवर्धन व अन्य बाबींना अंतर्भूत करणारा विकास प्रकल्प प्रत्यक्ष हाती घण्या आला आहे. जागामालक प्रसाद आपटे, माजी प्रांतधिकारी अमित शेडगे, उद्योजक दीपक गद्रे यांचे सहकार्य व ऍक्सिस बँकेच्या साथीमुळे प्रकल्पाचा प†िहला टप्पा पूर्ण झाला आहे.
स्थानिक रोजगार व पर्यटनपूरक विकासाला चालना देणाऱया या प्रकल्पाला वास्तूविशारद केसरकर, पुरातत्व विभाग संचालक डॉ. तेजस गर्गे, वास्तूविशारद समोर सावंत, संग्रहालय शास्त्र अमृता ठालकर, पुरातत्वशास्त्र ऋत्विज आपटे, तज्ञ श्रीवल्लभ साठे, दीपक व संतोष गवाणकर, छायचित्रकार कांचन मालगुंडकर यांची साथ लाभत आहे