सलग सुट्टय़ांमुळे पर्यटक करताहेत ‘एन्जॉय’: समुद्रकिनारे गजबजले
वार्ताहर / देवगड:
गेले दोन दिवस देवगड तालुक्यात मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत. तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वर, तांबळडेग, ऐतिहासिक किल्ले विजयदुर्गसह देवगडमधील समुद्र किनारा, पवनचक्की गार्डन येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. चालू वर्ष कोरोनाच्या दहशतीखाली गेले असले तरी या वर्षाच्या अखेरीस आलेल्या नाताळ, ख्रिसमस सणाच्या सलग सुट्टय़ांमध्ये नववर्षाच्या स्वागताचे ‘एन्जॉय’ करण्यासाठी पर्यटकांची पाऊले कोकणमधील पर्यटन स्थळांकडे वळली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने पर्यटन स्थळे अनलॉक केल्यानंतर प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पर्यटक देवगडमध्ये दाखल झालेले दिसत आहेत. पुणे, मुंबई, गोव्यासह परराज्यातील व परजिल्हय़ातील पर्यटक मोठय़ा संख्येने देवगडमधील पर्यटन स्थळांवर गर्दी करीत आहेत. यात श्रीक्षेत्र कुणकेश्वर, तांबळडेग, देवगड समुद्रकिनारी मोठय़ा संख्येने पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत. देवगड पवनचक्की गार्डनला पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे. देवगड पवनचक्की येथे नव्याने उभारण्यात आलेल्या झिपलाईन प्रकल्पालाचाही साहसी आनंद पर्यटक लुटत आहेत. id-data-recovery.html