नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना विषाणूचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. दररोज कोरोना संसर्गाची संख्या 90 हजारांच्या पुढे जात आहे. गेल्या 24 तासांविषयी बोलायचे झाल्यास कोरोना संसर्गाची 92 हजार 605 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर याच काळात 1,133 लोकांचा मृत्यू झाला. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 54 लाखांच्या वर पोहोचली आहे.
देशात कोरोनाची गती वाढत असली तरी नव्या रुग्णांपेक्षा जास्त लोक बरे होत आहेत. सध्या कोरोनाचे 10 लाख 10 हजार 824 सक्रिय रुग्ण आहेत. तर कोरोना संसर्गामुळे 86 हजार 752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 43 लाख 3 हजार 43 लोक बरे झाले आहेत. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार गेल्या 24 तासात देशात 12 लाख 06 हजार 806 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तसेच आतापर्यंत 6 कोटी 36 लाख 61 हजार 60 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.