विकास सावंत यांची माहिती, पालकांची होती मागणी
वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग तालुका निर्मितीनंतर शैक्षणिक प्रगती टप्प्याटप्प्याने होत असली तरी या प्रगतीत शैक्षणिक क्षेत्रात आपला वाटा असावा, या उद्देशाने लवकरच व्यवसायभिमुख कौशल्य प्रदान शिक्षणाच्या विविध शाखांची दालने दोडामार्ग शहरात सुरू होणार आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणासाठी इतर ठिकाणी शहरातील मुलांना अवलंबून राहावे न लागता ‘कोरोना’ काळात ठिकठिकाणी असणारी सीमाबंदी लक्षात घेऊन शहराच्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी नर्सरी ते पाचवी इंग्रजी माध्यमाचे शांतिनिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल येथे सुरू करत असल्याची घोषणा संस्थाध्यक्ष विकास सावंत यांनी केली. सदर स्कूल दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या इमारतीत सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहे.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शांतिनिकेतनचे सी. ई. ओ. एस. व्ही. माने, आयटी तज्ञ हर्षद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते आनंद तळकर, बाळा धाऊसकर, प्रा. डी. व्ही. राजगोळकर, मुख्याध्यापक बी. डी. तळेकर, ज्येष्ठ शिक्षक रमाकांत जाधव उपस्थित होते.
सावंत पुढे म्हणाले, ‘कोरोना’मुळे ठिकठिकाणी सीमाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा नजीकच्या गोवा राज्यात शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा महाराष्ट्रातून द्यावी लागली. आज मराठी भाषा सक्तीची असली तरी जगाची भाषा म्हणून इंग्रजी आलीच पाहिजे, यासाठी विद्यार्थी इंग्रजीकडे वळले. मराठी माध्यम शाळांची संख्या पुरेशी आहे. मात्र, दोडामार्गात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करावी, अशी स्थानिक पालकांची मागणी होती. ती विचारात घेऊन या शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील पालकांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन परवडणारी फी तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेणार आहेत. सर्व निकष पूर्ण करुन सुरू होत असलेल्या शाळेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी दर्जेदार शिक्षक असतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
दोडामार्ग शहर एज्युकेशन हब
दोडामार्ग तालुक्यात पदवी किंवा दहावी-बारावीनंतर व्यावसायिक शिक्षण देणाऱया संस्था नाहीत. याचा विचार करून सहामाही, वार्षिक व्यावसायिक अभ्यासक्रम येत्या काही काळात सुरू करू, असेही सावंत यांनी सांगितले.