प्राइम व्हिडिओची सर्वात मोठी सीरिज : 6 भाषांमध्ये होणार प्रदर्शित
एपिक फॅन्टेसी अँडव्हेचर ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स’ फिल्म सीरिजचे जगभरात मोठय़ा प्रमाणात चाहते आहेत. आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर या चित्रपटांची प्रीक्वल वेबसीरिज लॉर्ड ऑफ द रिंग्स-द रिंग्स ऑफ पॉवर’ येत आहे.
सीरिजचा पहिला टीझर प्राइम व्हिडिओने सोमवारी प्रदर्शित केला असून यात द रिंग्स ऑफ पॉवरची कहाणी आणि व्यक्तिरेखांची झलक दर्शविण्यात आली आहे. भारतात ही सीरिज 2 सप्टेंबर रोजी इंग्रजीसह हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड भाषेत एकत्रित प्रदर्शित होणार आहे. या सर्व भाषांमध्ये सीरिजचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
द लॉर्ड ऑफ द रिंग्स चित्रपटांपूर्वीच्या घटनांवर द रिंग्स ऑफ पॉवरची कहाणी आधारित असणार आहे. टीझरमध्ये या सीरिजची भव्यता दिसून येते. द रिंग्स ऑफ पॉवर ही प्राइमची सर्वात महागडी आणि मोठी सीरिज असल्याचे सांगण्यात येत आहे. द लॉर्ड ऑफ द रिंग्स सीरिजचा पहिला चित्रपट फेलोशिप ऑफ द रिंग 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 2002 मध्ये द टू टॉपर्स आणि 2003 मध्ये द रिटर्न ऑफ द किंग झळकला होता.