ऑनलाईन टीम / मुंबई :
पालघर जिल्ह्यात कासा येथील गडचिंचले येथे झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीला कोरोना ची बाधा झाली असल्याची माहिती मिळत आहे.
16 एप्रिलला झालेल्या या हत्याकांडातील 22 आरोपींना वाडा येथील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 एप्रिलला या आरोपीच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, आरोपीचा आज सकाळी प्राप्त झालेला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
या आरोपीच्या सहवासातील इतर 20 सह आरोपी आणि 23 पोलिसांना अलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या घशाचे नमुने घेण्यात येत आहेत.
दरम्यान या आरोपीला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दिली आहे.