प्रतिनिधी / कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराजांपासून छत्रपती घराणे आणि धनगर समाज यांच्यात नाते आहे. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे ही छत्रपती घराण्याची जबाबदारी आहे, अशा शब्दात खासदार संभाजीराजे यांनी आपल्या भावना मांडल्या.
धनगर समाज आरक्षण समन्वय समितीची गोलमेज परिषद शुक्रवारी कोल्हापुरात पार पडली. यानंतर माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्यासह समन्वय समितीच्या पदाधिकाऱयांनी न्यू पॅलेसवर जाऊन खासदार संभाजीराजे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धनगर समाजाच्या आरक्षण लढÎाची माहिती दिली. तसेच आरक्षणाला पाठिंबा देण्याची मागणी केली. यावेळी संभाजीराजे यांनी धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला आपला केवळ पाठिंबा नाही तर त्यासाठी आपण जातीने पाठपुरावा करू, असेही स्पष्ट केले.
संभाजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा कोल्हापूरला आहे. अशा या शाहूनगरीत धनगर बांधवांची गोलमेज परिषद झाली याचा विशेष आनंद आहे. शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षण दिले. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीयासह मराठा समाजाचाही समावेश होता. आंतरजातीय विवाहाचा केवळ पुरस्कार न करता शाहू महाराजांनी कृती केली. आपल्या जनक घराण्यातील बहीण चंद्रभागा घाटगे यांचा विवाह धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिला. त्या काळापासून धनगर समाजाची छत्रपती घराण्याशी नाळ जुळली आहे. नाते निर्माण झाले आहे. धनगर समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे आजच्या काळात धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे ही छत्रपती घराण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ पाठिंबा नाही तर पाठपुरावा करणार असल्याचेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.