जंगल सफारी सुसाट : लाखो पर्यटकांची भेट : वर्षभरात 16 लाख महसूल प्राप्त : विविध प्राणी-पक्ष्यांचेही दर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
शहरापासून अवघ्या 20 ते 25 कि. मी. अंतरावर असलेल्या धामणे (एस.) वनक्षेत्रात जंगल सफारीला सुरुवात झाली आहे. वर्षभरात लाखो पर्यटकांनी भेट देऊन जंगल सफारीचा आणि निसर्गसंपदेचा मनमुराद आनंद लुटला आहे. यातून वनखात्याला तब्बल 16 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे वनखात्याने धामणे परिसरात राबविलेला जंगल सफारीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
वनखात्याने गतवर्षीपासून जैवविविधतेने नटलेल्या धामणे येथील 1500 हेक्टर क्षेत्रात जंगल सफारी सुरू केली आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील जैवविविधता अगदी जवळून पाहता येत आहे. विशेषत: हत्ती, हरिण, कोल्हे, बिबटे, मोर, जंगली डुक्कर, तरस, गवे, जंगली कुत्री यासह विविध पक्ष्यांचेही दर्शन होत आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ जंगल सफारीकडे वाढला आहे. त्यामुळे वर्षभरात येथे लाखो पर्यटकांनी भेट दिली. वनक्षेत्रात कोसळणारे धबधबे, नाले आणि चोहोबाजूंनी असलेली हिरवाई पर्यटकांना साद घालत आहे. विशेषत: बेळगाव, चंदगड, गोवा, हुबळी, दावणगिरी, कोकण, कोल्हापूर आदी ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. वनक्षेत्रात तीन ट्रेकिंग पाथ निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांना जवळून निसर्गाचा आनंद लुटता येत आहे.
या जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना पूर्ण क्षमतेने भरलेला तिलारी डॅम, खळाळणारे नाले, आजूबाजूंची हिरवीगार झाडे आणि पक्ष्यांचा किलबिलाट अगदी जवळून न्याहाळता येत आहे. त्याबरोबर अधूनमधून वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. क्arहूक्aाम्दूदल्rग्sस्.म्दस् यावर ऑनलाईन बुकिंग करून भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी खात्याने चार सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. शिवाय सफारीदरम्यान या सुरक्षा रक्षकांबरोबर ये-जा सुरू आहे.
पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी
पावसाळ्यात जंगली सफारीसाठी पर्यटकांची गर्दी वाढली होती. येथील जैवविविधतेचा आनंद लुटण्याबरोबर निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती. याबरोबरच वनखात्याने पर्यटकांना माहिती देण्यासाठी गाईडची नियुक्ती केली आहे.
शैक्षणिक सहलीही दाखल
शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक सहलींचे नियोजन जंगल सफारीसाठी करू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बालवयात जंगल आणि वन्यप्राण्यांबद्दल माहिती मिळत आहे. विशेषत: शैक्षणिक सहलींसाठी सवलतीच्या दरात प्रवेश शुल्क आकारणी केली जात आहे. सध्या शैक्षणिक सहलींचा हंगाम असल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे.
ही जंगल सफारी सण-उत्सव वगळता इतर दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत सुरू असते. प्रत्येक पर्यटकासाठी 250 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे.
लाखो पर्यटकांची वर्षभरात भेट
नागरिकांना वनक्षेत्राचा आनंद लुटता यावा, यासाठी मागील वर्षीपासून धामणे एस. परिसरातील वनक्षेत्रात ट्रेकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ट्रेकिंगसाठी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. वर्षभरात लाखो पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. त्यामुळे समाधानकारक महसूल प्राप्त होत असल्याचे बेळगाव विभागाचे आरएफओ पुरुषोत्तम रावजी यांनी सांगितले.